
अंबाबाई गर्दी
अंबाबाईची सालंकृत
झोपाळ्यावरील पूजा
अक्षय्य तृतीयेनिमित्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्ष्यय तृतीयेनिमित्त आज श्री अंबाबाईची झोपाळ्यावरील सालंकृत पूजा बांधण्यात आली. दरम्यान, गरुड मंडपात सायंकाळी पारंपरिक उत्साहात श्री अंबाबाईचा दोलोत्सव साजरा झाला. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली. दरम्यान, सायंकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मगच खरेदी करण्यावरही अनेकांनी भर दिला.
दोलोत्सव म्हणजे अंबाबाई झोपाळ्यावर आरूढ होऊन गौरीप्रमाणे झोके घेते. सूर्यास्तापूर्वी मंगलवाद्यांच्या गजरात उत्सवमूर्ती गरुड मंडपात आणण्यात आली. झोपाळ्यावर विराजमान झाल्यानंतर सालंकृत पूजा बांधण्यात आली. सोबत चवऱ्या, मोर्चेल, अब्दागिरीही विराजमान झाल्या. विविध पाना-फुलांनी गरुड मंडप सजला आणि दोलोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर सुवासिनींकडून हळदी-कुंकवाबरोबरच कैरीचे पन्हे आणि आंबेडाळ देण्याची धांदल सुरू झाली. रात्री पाऊणेनऊनंतर पुन्हा चोपदारांच्या ललकारीने उत्सवमूर्तीचे गर्भगृहाकडे प्रस्थान झाले आणि त्यानंतर शेजारती झाली.
मूर्तीसाठी चांदीचा कमरपट्टा
येथील सराफ व्यावसायिकांनी आज देवस्थान समितीकडे करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीसाठी चांदीचा कमरपट्टा सुपूर्द केला. सराफ व्यापारी संघाने समितीकडे ५१ किलो चांदीची मूर्ती दिली आहे. त्या मूर्तीसाठी १९८.१३० वजनाचा कमरपट्टा सुपूर्द केला. समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्याचा स्वीकार केला. संघाचे माजी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, दिनकर लाळगे, अमर पाटील, जयसिंग हिलगे, ऋषीकेश पाटील, सौ. दीपा लाळगे व कारागीर अभिजित देवरूखकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54833 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..