
बालकलाकारांनी जिंकली रसिकांची मने
19251
गडहिंग्लज : नगरपालिका व गडहिंग्लज कला अकादमीतर्फे झालेल्या बालनाट्य महोत्सावत कला सादर करताना बालकलाकार.
बालकलाकारांनी जिंकली रसिकांची मने
गडहिंग्लजला बालनाट्य महोत्सव; ‘चम चम चमको’ आणि ‘मदर्स डे’चे सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : येथील नगरपालिका व गडहिंग्लज कला अकादमीतर्फे बालनाट्य महोत्सव झाला. या महोत्सवात चम चम चमको आणि मदर्स डे या दोन बालनाट्यांचे सादरीकरण झाले. बालकलाकारांनी गडहिंग्लजकर रसिकांची मने जिंकली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत येथील जनता खुल्या नाट्यगृहात हा बालनाट्य महोत्सव झाला.
धनंजय सरदेशपांडे लिखित ‘चम चम चमको’ या नाटकातून पालकांच्या अवास्तव उपेक्षेमुळे मुलांची होणारी मानसिक घुसमट मांडण्याचा प्रयत्न झाला. रियालिटी शोच्या प्रसिद्धीची हाव आजच्या पालकांना कोणत्या थराला घेऊन जाते याचे दर्शन सदर नाटकातून घडविले. राधिका पाटील, विभा शिंदे, आर्यन चौगुले, भक्ती पाटील, समृद्धी पाटील, वेदांत देसाई, शिवानी शिंदे, अनुज आणि आदित्य लाटकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयातून रसिकांची मने जिंकली. पुंडलिक परीट यांचे प्रभावी दिग्दर्शन, शिवाजी पाटील यांची प्रकाशयोजना, कॅम्प्स कांबळे यांचे ध्वनीसंयोजन होते.
‘मदर्स डे’ या दुसऱ्या बालनाट्यातून अनाथाश्रमातील मुलांच्या मनाचा तळठाव शोधण्याचा आणि आईबद्दलच्या संकल्पनांचा सूचक वेध घेण्याचा प्रयत्न झाला. धनंजय सरदेशपांडे यांचेच लेखन असलेल्या या नाटकात नेपथ्यापासून ते प्रकाशयोजनेपर्यंत प्रभावी आविष्कार अनुभवायला मिळाला. अर्णवी उपराटे हिने साकारलेली मिर्ची प्रेक्षकांची मने जिंकून गेली. मयूरेश शिंदे, वरद घुले, श्रद्धा कुंभार, अमेय नावलगी या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी होता. अधिरा, सौंदर्या, अंकिता, दक्ष, कृतिका, श्रावणी, रिया, भूमी, सर्वेश, श्रावण, सोहम, करुणा, राधिका यांनीही भूमिका वठविल्या. इंद्रजित गाडे, आकाश हत्तरकी, अरुण पाटील, प्रभाकर दुंडगे, वेदिका, श्रुती यांनी रंगमंच व्यवस्था पाहिली होती.
तत्पूर्वी, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते नाट्य महोत्सवाचे उद्घाटन झाले. तहसीलदार दिनेश पारगे, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य विद्याधर गुरबे उपस्थित होते. राजश्री कोले यांनी सूत्रसंचालन केले. उर्मिला कदम यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54869 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..