
संगीत दरबारातून लोकराजाला स्वरांजली
19255
गडहिंग्लज : शाहू सभागृहात झालेल्या संगीत दरबारात शास्त्रीय गायन करताना कलाकार.
संगीत दरबारातून लोकराजाला स्वरांजली
गडहिंग्लज नगरपालिका; सारथी ट्रस्ट, फ्युजन ड्रामा स्कूलतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : येथील नगरपालिका, सारथी ट्रस्ट व फ्युजन ड्रामा स्कूल व कोल्हापूर येथील गुणीदास फाउंडेशन, शिवाजी विद्यापीठाचा संगीत नाट्यशास्त्र विभाग, देवल क्लबतर्फे संगीत दरबार झाला. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या कृतज्ञता पर्वात त्याचे आयोजन केले होते. शास्त्रीय, सुगम व नाट्यगीतांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. पालिकेच्या शाहू सभागृहात झालेल्या या संगीत दरबारातून लोकराजाला स्वरांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी रोहित फाटक यांनी राग दुर्गा, विलंबित एकतालातील बंदीश, दृतरचना, दृत त्रिताल व तराणा दृत एकताल यासह कन्नड बचन सादर करून रसिकांची मने जिंकली. विदुषी सुखदा काणे यांनी राग ललितगौरी, विलंबित रचना प्रतिम सय्या, दृतरचना दृत त्रिताल सादर केल्या. देवल क्लबच्या विद्यार्थ्यांनी समूह गायनाचा नजराना पेश केला. ऋचा गावंदे, राजेंद्र म्हेस्त्री, मुकुंद वेल्हाळ, किरण कांबळे यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून कार्यक्रमाची उंची वाढविली. स्वरुप दिवाण, नरेंद्र पाटील, संदेश गावंदे, विक्रम परीट, शिवाजी सुतार या वादकांची साथ मिळाली.
तत्पूर्वी, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमा पूजनाने संगीत दरबाराची सुरुवात झाली. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, मुख्याधिकारी स्वरुप खारगे, आजरा कारखान्याचे अध्यक्ष सुनील शिंत्रे, अभिनेता अमोल देसाई, मच्छिंद्र बुवा, डॉ. सदानंद पाटणे, किसन धबाले, श्वेता पडदाळे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54875 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..