यीन समर समीट बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यीन समर समीट बातमी
यीन समर समीट बातमी

यीन समर समीट बातमी

sakal_logo
By

१९३१५

तरुणाईचे भावविश्‍व घडवण्यासाठी यिन व्यासपीठ
गृह राज्यमंत्री सतेज पाटील; ‘यिन समर यूथ समिट २२’चा दिमाखात प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः तरुण वयात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शिक्षणामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्याही विकसित होतो, या संकल्पनेचा फेरविचार केला पाहिजे. पूर्वी विद्यार्थ्यांचे आकलन, बुद्धिमत्ता यावर पालक, शिक्षक अधिक लक्ष द्यायचे. युवा पिढीचे भावविश्व घडवण्याच्या दृष्टिकोनातून यिन महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ‘समर यूथ समिट’ यांसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांसमोर नवे विचार आणि कर्तृत्ववान व्यक्तींची अनुभवाची शिदोरी खुली होणार असून त्यातून तरुण मने विकसित होतील. असे गौरवोद्‍गार गृहराज्य व पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते आज ‘यिन समर यूथ समिट २२’चा प्रारंभ झाला. विवेकानंद महाविद्यालयात हा उपक्रम सुरू आहे.
‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘समाजाच्या सर्वच क्षेत्रांत नेतृत्वाची वानवा आहे. राजकारणात नेतृत्व घडवण्याची एक प्रक्रिया असते मात्र अन्य क्षेत्रात तसे नाही. असे सक्षम नेतृत्व घडवण्याचे काम यिनच्या माध्यमातून केले जाते. निवडणुका, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यामागे आदर्श नागरिक घडवण्याचा उद्देश आहे. पदवी, शिक्षण आणि बाजारपेठेतील मनुष्यबळाची गरज यामध्ये विसंगती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यावरही यिनच्या उपक्रमात भर दिला जातो. पैसे म्हणजे सुख नव्हेतर समाजाप्रती असणाऱ्या कर्तव्यातून केले जाणारे सामाजिक काम हे आत्मिक समाधान देणारे असते, हा संस्कार यिनच्या माध्यमातून केला आहे. आज देशामध्ये द्वेषाचे वातावरण असताना बंधुभाव आणि समतेची भावना निर्माण होण्यासाठी असे उपक्रम राज्यभर केले जाणार आहेत.’’
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘तरुणाई हा देशाचा लाभांश आहे. मात्र तो सकारात्मक पद्धतीने विकास प्रक्रियेत आणला पाहिजे. शिक्षणामुळे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सक्षम होतो या संकल्पनेचा पुनर्विचार केला पाहिजे. आकलन क्षमता, बुद्धिमत्ता याचबरोबर विद्यार्थ्यांचे भावविश्व घडवणेही महत्त्वाचे आहे. यासाठी यिनसारखे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. आज तरुणाईच्या कल्पकतेतून सुरू झालेले स्विगी, झोमॅटो यांसारखे स्टार्टपचे रुपांतर व्यवसायात झाले. अशा पद्धतीने उद्योग, व्यवसायाचा विचार करणे गरजेचे आहे. सध्या देशात बहुमताच्या जोरावर वैचारिक एकारलेपण लादले जात आहे. अशा काळात यिनने घेतलेली समिट वैचारिक प्रदूषण कमी करण्यास उपयुक्त ठरतील.’’
श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, ‘‘विज्ञानाच्या ज्ञानाबरोबरच त्याग, चारित्र्य, सामाजिक जाणीव या मूल्यांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. यासाठी यिनने घेतलेले उपक्रम महत्त्‍वाचे आहेत. ते विद्यार्थ्यांमधील स्फुल्लिंग चेतवणारे असून त्याला संस्थेचे पाठबळ देऊ.’’
विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार म्हणाले, ‘‘नवीन विद्यापीठ कायद्यानुसार स्टुडंट कौन्सिल असणे बंधनकारक होते. मात्र महाविद्यालयांसाठी ही अवघड बाब होती. यिनसारख्या व्यासपीठामुळे हे करणे सोपे होईल.’’
पिंपरी-चिंचवड एज्युकेश ट्रस्टचे शीतलकुमार रवंदळे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी कोणत्याही एका क्षेत्रात स्वतःला तज्ज्ञ बनवले तरच स्पर्धात्मक जगात टिकता येईल.’’
युनिक अॅकॅडमीचे संचालक प्रवीण चव्हाण म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी क्षमता आणि गुण ओळखले पाहिजेत. ज्यात आवड आहे त्याचे व्यवसायात किंवा करिअरमध्ये कसे रुपांतर करता येईल, याचा विचार करावा. त्यादृष्टीने कौशल्ये विकसित करावीत.’’
भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, ‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे महाराष्ट्र प्रमुख, सकाळ माध्यम प्रा. लि. चे संपादक संदीप काळे, ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, मुख्य व्यवस्थापक (वितरण) महेश डाकरे, यीन मॅनेजर श्यामसुंदर माडेवार, यिन मुख्यमंत्री पार्थ देसाई, विरोधी पक्षनेत्या समृद्धी ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभागीय अधिकारी अवधूत गायकवाड, सूरज जमादार, अभिजित शिंदे, अजिंक्य शेवाळे, आकाश पांढरे, उदय माळी यांनी केले होते.

प्रमुख प्रायोजक
समिटला युनिक अॅकॅडमी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, ऋतुराज पाटील फौंडेशन, आमदार जयश्री जाधव, विवेकानंद शिक्षण संस्था, नरके पन्हाळा पब्लिक स्कूल, ॲस्टर आधार हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

भरतनाट्यम्‌चा नृत्याविष्कार
कार्यक्रमाची सुरुवात भरतनाट्यम्‌ने झाली. नित्यनिकेतन डान्स स्कूल अँड रिसर्च अॅकॅडमी यांच्या नृत्यांगनांनी हा नृत्याविष्कार सादर केला. यामध्ये स्वरा सूर्यवंशी, कशिष पंजाबी, सिया सारडा, आर्या पाटील, अनुष्का पाटील, संस्कृती कोळी, आदिती जाधव यांचा सहभाग होता. डॉ. बिंदू सतीश राव यांनी याचे आयोजन केले होते.

१९३१७
तरुण, तरुणींना सामाजिक प्रश्न पडले पाहिजेत. त्यांचा पाठपुरावा करून उत्तरे शोधली पाहिजेत. या उत्तरांमधून त्यांना समाजातील विसंगती, अन्याय, शोषण दिसून येईल. त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, तरच शिक्षणाचा आणि ज्ञानाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल. शेतकरी आणि कामगारांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळला आहे. मात्र त्यांनाच न्याय मिळत नाही हे इथले वास्तव आहे.
- राजू शेट्टी, माजी खासदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54883 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top