
अडलेले विवाहच्छूक फसवणुकीच्या जाळ्यात
अडलेले विवाहेच्छुक फसवणुकीच्या जाळ्यात
एजंटांची करामत; तेलही गेले अन् तूपही गेल्याची अवस्था, सावधतेची गरज
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : विवाहेच्छुक तरुणांच्या लग्नाचा प्रश्न जटिल बनत आहे. त्याला कारणे अनेक आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या प्रश्नाच्या गुंत्यातून नवे प्रश्न निर्माण होत आहेत. अडलेले विवाहेच्छुक फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील तरुणींसोबत लग्न लावायचे, त्या बदल्यात वर पक्षाकडून दोन-अडीच लाख रुपये उकळण्याची करामत एजंटांकडून सुरू आहे. कहर म्हणजे लग्नानंतर तरुणींनी केलेल्या पोबाऱ्यामुळे वर पक्षाची अवस्था तेलही गेले अन् तूपही गेले, अशीच होत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील दोन गावांत घडलेल्या अशा घटनांमुळे सावध होण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. युवकांच्या हाताला काम मिळणे अडचणीचे बनले आहे. कोरोनाच्या संकटानंतर तर यामध्ये भरच पडली आहे. दुसरीकडे शेतीतून उत्पन्न घटले आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेती परवडेनाशी झाली आहे. परिणामी, लग्नासाठी स्थळ जुळविताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुलींच्या शिक्षणाचे वाढलेले प्रमाण, नोकरदारच मुलगा हवा, यासह वधू पक्षाकडील विशेषत: वधूच्या अटीमुळे विवाहेच्छुक तरुणांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला असल्याचे चित्र आहे. अडलेल्या लग्नामुळे वय उलटून गेलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे.
याच परिस्थितीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. गडहिंग्लज तालुक्यात काही एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांच्याकडून अडलेले विवाहेच्छुक हेरले जातात. त्यांना विदर्भ, मराठवाड्यातील मुलींचे स्थळ काढले जाते. लग्न जुळविण्यासाठी वधू पक्षाला दोन ते अडीच लाख रुपये देण्याची मागणी होते. चर्चा सफल झाल्यानंतर लग्नाचा बार काढला जातो. गडहिंग्लज तालुक्यातील दोन गावांत अशाच प्रकारे लग्न जुळविण्यात आली होती; पण लग्नानंतर अवघ्या पंधरवड्यातच नववधूंनी पोबारा केला आहे. त्यामुळे वर पक्षाची मोठी गोची झाल्याचे चित्र आहे. विवाहेच्छुक तरुणांनी अशा फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहण्याची गरज आहे.
----------------
चौकट
तक्रार देण्याची अडचण...
लग्न जुळविण्यासाठी लाखात रक्कम मोजली; पण लग्नानंतर मुलींनी पोबारा केला. त्यामुळे मुलगी गेली ती गेलीच, वर कष्टाच्या पैशांवरही पाणी सोडावे लागले आहे; मात्र याची तक्रार करायची कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजात बेअब्रू होऊ नये म्हणून पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले जात असल्याचे समोर येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54961 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..