
त्रिसदस्यीय रचनेनुसार होणार निवडणूक
लोगो ःमहापालिका....
त्रिसदस्यीय रचनेनुसार
होणार निवडणूक
कोल्हापूर, ता. ४ ः सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याबाबतचे आदेश देताना १० मार्च २०२२ मधील स्थिती कायम ठेवून तेथून पुढील प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले असल्याने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रभागरचनेबाबत काही बदल न झाल्यास, तसेच मतदार यादीचा कार्यक्रम गतीने राबवल्यास जून ते जुलै दरम्यान निवडणूक होऊ शकते. पावसाळ्याचा विचार करून मतदानाच्या वेळापत्रकात बदल केला जाण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
महापालिका सभागृहाची मुदत संपून दोन वर्षे होणार आहेत. मुदत संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी ८१ सदस्यांप्रमाणे प्रभाग रचनेची प्रक्रिया राबवून मतदार यादी अंतिम करण्यापर्यंतचा कार्यक्रम राबवला होता. कोरोनानंतर पुढील प्रक्रिया थांबली. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केली होती. कोरोना काळाचा भर संपल्यानंतर निवडणुकीबाबतची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावेळी २०११ ते २१ पर्यंतच्या लोकसंख्या वाढीचा विचार करून त्या प्रमाणात प्रभागांची वाढ करत रचना करण्याबाबत सरकारने आदेश दिला. त्यामध्ये सरकारकडून लोकसंख्या निश्चितीचे सूत्र दिले होते. त्या सुत्रानुसार लोकसंख्या विचारात घेऊन एकसदस्यीय प्रमाणे ९० सदस्यांची प्रभाग रचना केली.
ही प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर असताना सरकारने नवीन आदेश काढून बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे कार्यवाही करण्यास सांगितले. ती रचना मंजुरीसाठी पाठवली असताना राज्य सरकारने मार्च २०२२ मध्ये नवीन कायदा केल्याने ती रद्द केली. गेल्या महिन्यात नवीन प्रभाग रचना करण्याचे पत्र दिले आहे. त्यामध्ये बहुसदस्यीय की एकसदस्यीय असा काही उल्लेख नव्हता. तसेच ती किती मुदतीत पूर्ण करायची आहे, हेही सांगितलेले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून वेट ॲंड वॉच भूमिकेत होते. आता राज्य निवडणूक आयोग, तसेच राज्य सरकारकडून सूचना आल्यास त्यानुसार तातडीने कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे.
त्रिसदस्यीचा प्रस्ताव अंतिम करणे शिल्लक
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती आयोगाकडे पाठवल्या असून, त्यावर सुनावणी होणार होती. त्या दरम्यान नवीन कायद्यामुळे ती प्रक्रिया रद्द केली. आता न्यायालयाने १० मार्च २०२२ ला जी स्थिती होती, तेथून पुढे प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यास सांगितले आहे. महापालिकेने हरकतींवर सुनावणी घेऊन अभिप्राय पाठवला आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून ती प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम शिल्लक आहे. तसेच कच्च्या मतदार यादीचा कार्यक्रम जवळपास झाला आहे. प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्याचा कार्यक्रम राबवावा लागणार आहे. त्यानंतर त्या मतदार यादीवर हरकती, सुनावणी घेऊन अंतिम केली जाईल. हा कार्यक्रम जूनपर्यंत पूर्ण होऊ शकतो. त्यानंतर ३० ते ४५ दिवसांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम घेतला जाऊ शकतो. त्यामुळे जुलै अखेरपर्यंतची मतदानाची तारीख निश्चित केली जाऊ शकते; पण पावसाची स्थिती पाहिल्यास ती पुढेही ढकलली जाऊ शकते.
प्रभाग रचना
तीन सदस्यांचा एक प्रभाग ठरवण्यात आला. महापालिका प्रशासनाने ३१ प्रभागांसाठी ९२ नगरसेवक निश्चित केले. त्यातील ३० प्रभागांत तीन तर एका प्रभागात दोन नगरसेवक होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y54992 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..