शिरोली यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरोली यात्रा
शिरोली यात्रा

शिरोली यात्रा

sakal_logo
By

पट्टी शिरोली पुलाची यात्रा व उरूस विशेष.


लीड
हातकणंगले तालुक्यातील शिरोली सुमारे ८० हजार लोकसंख्या असलेले गाव. तालुक्यातील पश्‍चिम बाजूचे शेवटचे आणि कोल्हापूरपासून पाच किलोमीटरवरचे पंचगंगा काठावर वसलेले गाव. शिरोली गावची ओळख जिल्ह्याबरोबरच राज्याला आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या माध्यमातून राज्यात शिरोली नाव प्रसिद्ध आहे. गावात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेला पीर अहमदसोा, पीर बालेचाँदसोा यांचा उरूस आजही उत्साहाने गावातील लोक साजरा करतात.

19403

पीर अहमदसोा, पीर बालेचाँदसोा माहात्म्य
या पिरांची आख्यायिका अशी आहे की, सुमारे २०० वर्षांपूर्वी शिरोली गावचे गावकामगार पोलिसपाटील सर्जेरावदादा पाटील हे गावच्या कामासाठी कोल्हापूरला गेले असताना पंचगंगा नदीजवळ त्यांना पीर बालेचाँदसोा यांच्या एक दैवी आकाराच्या शिळेचा उगम झालेला दिसला. त्या शिळेला नमस्कार करून त्यांनी गावासाठी म्हणणे मागितले की, ज्या कामासाठी कोल्हापूरला कोर्टात चाललो आहे, ते माझ्यासारखे होऊ दे. मी त्या बदल्यात गावात प्रतिवर्षी गावातील सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित करून तुझा उरूस साजरा करतो. त्यांचे काम पूर्ण झाल्यापासून शिरोलीत उरुसाची सुरुवात झाली, असे सांगितले जाते. पूर्वी गावातील लोकांकडून शेतसारा वसुलीच्या वेळी उरुसासाठी प्रत्येकी २५ पैसे घ्यायचे व त्या जमा झालेल्या पैशांतून उरूस कार्यक्रम पार पाडायचा. पीर बालेचाँदसोा यांचे भक्त हामजू आबा मुल्लाणी या दर्ग्याची मनापासून सेवा करत असताना सर्जेराव पाटील, बाळू पाटील यांना उरुसात गलेफ घालण्याचा मान दिला व गावातील सर्व लोकांच्या सहकार्याने उरूस साजरा होऊ लागला. पीर बालेचँदसोा दर्ग्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सर्व बांधकाम भाविक व दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनी भक्तिभावाने दिलेल्या देणगीतून पूर्ण झाले आहे. प्रत्येक गुरुवारी व अमावस्येला भक्त दर्शनाला येतात.

19401
पीर अहमदसोा
शिरोली गावच्या पश्‍चिमेस पंचगंगा नदीकाठावर वडाच्या झाडाच्या छायेत एक साधू महाराज राहण्यासाठी आले होते. ते साधू महारोग्यांवर उपचार करत. त्यामुळे आसपासच्या जिल्ह्यांतून लोक त्यांच्याकडे उपचारांसाठी येत होते. हे साधू महाराज म्हणजे पीर अहमदसोा. पीर अहमदसोा यांची मनोभावी सेवा सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील भक्त चमन महात करत होते. कालांतराने पीर अहमदसोा यांचे देहावसान झाले. नंतर चमन महात पोथी वाचत बसले असताना त्यांना दृष्टांत झाला व त्यानंतर त्या ठिकाणी पीर अहमद यांचा दर्गा बांधला व त्यांच्या समाधीची पूजा-अर्चा सुरू ठेवली. पुढे आबा महात यांनाही पीर अहमदसोा यांचा दृष्टांत झाला. तेव्हापासून उरुसाचा पहिला दिवस हा पीर अहमदसोा यांचा असतो व दुसरा दिवस पीर बालेचाँदसोा यांच्या नावाने साजरा होतो. आजही मोठ्या उत्साहात आतषबाजी, गंध व गलेफ चढविला जातो. पीर अहमदसोा दर्ग्याची देखभाल मीरासाब महात व सलीम महात स्वखर्चाने करतात.
--
फोटो
02368
शिरोलीचे ग्रामदैवत काशिलिंग बिरदेव
साधारणपणे २०० ते २२५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सध्या हाळ म्हणून ओळखतो तो म्हणजे पंचगंगा नदीकाठच्या आग्नेय दिशेचा भाग. पूर्वी बरीच वस्ती असलेला हा भाग. जुन्या काळी महापुरातून वाचलेली माणसे वस्ती वसवून तिथेच झोपड्या बांधून राहिली. काही दिवसांनी म्हणजेच १८५० च्या सुमारास अचानक आग लागून गाव भस्मसात झाले. पुढे मात्र तेथे कौलारू घरे बांधली. त्या वेळचे संपूर्ण गाव म्हणजे सध्याच्या बी वॉर्ड आणि ए वॉर्डचा काही भाग. शिरोलीच्या ग्रामस्थांचे आराध्य दैवत म्हणजे बिरदेव मंदिर. हे गावच्या उत्तरेस आहे. हे बिरदेव मंदिर शिरोली गावचे प्रमुख ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. या बिरदेवाबाबत एक अख्यायिका आहे. बिरदेव हा मूळ शिरोली गावचा नसून तो इचलकरंजी येथील आहे. या देवाचे माहात्म्य ऐकून गावातील सोडगे कुटुंबीयातील पूर्वज नाथा (बनशेट्टी) सोडगे हा धार्मिक व श्रद्धाळू होता. दिवसभर काम करून तो इचलकरंजीस देवाच्या दर्शनासाठी पायी जात असे. गाडग्यात भात शिजवून भक्तिभावे पूजा करून भाताचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद भक्षण करीत असे. अशी त्याने नित्यनियमाने १२ वर्षे भगवंताची सेवा केली. त्याच्या नियमात कधीही खंड पडला नाही.
काही दिवसांनी नाथा (बनशेट्टी) सोडगे यास दृष्टांत झाला. देव स्वप्नात येऊन म्हणाला, “हे भक्ता तू माझी फार सेवा केलीस. आता तू थकला आहेस. तरी इथे येण्याचे कष्ट तू आजपासून घेऊ नकोस. मीच तुझ्या गावी येतो.” त्यावेळी भक्त म्हणाला, “तुम्ही येणार हे खरे आहे. पण मला आल्याचे कसे कळणार?” त्यावेळी देव म्हणाले, “मी ज्या ठिकाणी येणार आहे, ती खूण सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक.
‘बोरी-बाभळ बेटाला,
फड्याच्या तटाला
वारुळाच्या मखनाला
आणि कमळाच्या बनाला...!’
अशा ठिकाणी ज्यावेळी तुझी वांझ असलेली कपिला गाय तिचे दावे आपोआप सुटून येतील व पान्हा सोडेल, त्यावेळी मी सर्पाचे रूप घेऊन गायीचे दूध प्राशन करीन. त्या ठिकाणी माझी स्थापना कर,” असे सांगून देव अदृश्य झाला. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. देवांनी त्याचदिवशी यायचे ठरविले. टाकडे गावी असणाऱ्या अंतर्यामी म्हसोबा देवास हे समजले. त्यांनीही देवाबरोबर येण्याचा आग्रह धरला आणि दोघेही आले. देवाने म्हसोबास ‘तू इथे वास्तव्य कर, मी गावात वास्तव्य करतो,’ असे सांगून म्हसोबास वेशीबाहेर थांबविले. ते म्हसोबाचे मंदिर राज्य महामार्गाच्या पूर्वेस आहे.
रविवारी सकाळी देव आले. त्यावेळी नाथा सोडगे मोट हाकत होता. त्यावेळी त्याचे लक्ष कपिला गायीकडे गेले. तिला पान्हा फुटलेला होता. तिचे दाव्याचे बंधन दूर झाले होते. ती पूर्व दिशेला धावत होती. लगेच मोट बांधून तो तिच्या पाठोपाठ चालू लागला. सध्या मंदिरात जिथे मूर्ती आहे त्याठिकाणी कपिला गाय उभी राहिली व देवाने सर्पाचे रूप घेऊन गायीचे दूध प्राशन केले. त्याच ठिकाणी त्या बनशेट्टीने गावातील ग्रामस्थांना बोलावून मोठ्या आनंदाने देवाची प्रतिष्ठापना केली. त्या ठिकाणी थोड्या दिवसांनी मंदिर बांधले गेले. पुढे गावातील वेगवेगळ्या समाजातील भक्तांमुळे मानपान निर्माण झाला.
दसरा व पाडव्याला नैवेद्य सोडगे समाजाचा प्रथम स्वीकारला जातो. पालखीला खांदा देण्याचा मान उनाळे घराण्याचा, सुताराचे पान सीमोल्लंघनाचा मान तसेच पाडव्याच्या भाकणुकीचा मान, नवरात्र उत्सव काळातील आरतीचा मान हा (कै.) तात्यासाहेब माधवराव पाटील (माजी पोलिसपाटील) यांच्या घराण्याचा आहे.
सोने लुटण्याच्या दिवशी देवाची पालखी गावात फिरून ग्रामस्थांच्या व भक्तपरिवारासमवेत दसरा मैदानात जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55001 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top