
कृतज्ञता पर्व एकत्रित
लोगो- कृतज्ञता पर्व
१९४०४
स्टार्टअपसाठी पायाभूत सुविधा निर्माण करूया
श्रीराम पवार ः लोकराजा स्टार्टअप-इनोव्हेशन फेस्टिव्हलमध्ये मंथन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः राजर्षी शाहूंनी राज्यकारभार करताना अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या. त्यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वात स्टार्टअप-इनोव्हेशन फेस्टिव्हलचा उपक्रम कौतुकास्पदच आहे; मात्र या क्षेत्रासाठी आवश्यक सर्व त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी याच पर्वाच्या निमित्ताने सारे मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन आज ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी केले. लोकराजा स्टार्टअप- इनोव्हेशन फेस्टिव्हलमध्ये आज झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
संपादक-संचालक श्रीराम पवार म्हणाले, ‘‘कोल्हापूरनं नेहमीच विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण संकल्पना राबवल्या आणि त्या यशस्वी केल्या. राजर्षी शाहूंच्या कारकिर्दीत तर जगभरातील नव्या गोष्टी स्वीकारताना लोकसहभागातून अनेक नवसंकल्पना पुढे आल्या. गुळाच्या लाकडी घाण्यामुळे होणारे अपघात कमी होण्यासाठी नव्या यंत्राची निर्मिती झाली पाहिजे, असा राजर्षी शाहूंनी आग्रह धरला आणि त्यासाठी लोकांतूनच नव्या संकल्पना पुढे याव्यात, यासाठी स्पर्धा जाहीर केली होती. आज शंभर वर्षानंतर तंत्रज्ञान खूप झपाट्याने बदलले असले तरी स्टार्टअप- इनोव्हेशनचा विचार करता त्याच पद्धतीने आपल्याला पुढे जावे लागते आहे.’’
स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक नवसंकल्पना आता पुढे येत आहेत. मात्र सुरू झालेली अनेक स्टार्टअप बंद का पडतात, याचाही विचार होणे गरजेचे आहे. या क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सर्वच पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित असून या वर्षात त्यावरच अधिक भर देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
मनोरमा इन्फोसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संस्थापक, सीईओ अश्विनी दानिगोंड यांनी ‘मनोरमार’ची यशकथा यावेळी उलगडली. ‘मनोरमा‘च्या निमित्ताने कोल्हापूरचे नाव जगभरात झळकले. मात्र, मेट्रोसिटी आणि कोल्हापुरातून काम करताना येताना नेमक्या कोणत्या अडचणी आहेत आणि त्यावर कशी मात केली, याविषयीही त्यांनी सविस्तर विवेचन केले.
मयुरा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक रवि डोली यांनी मयुरा स्टीलची यशकथा सांगितली. उद्योगांत यांत्रिकीकरणापेक्षा कुशल मनुष्यबळाला अधिक भर दिला पाहिजे, हा आग्रह पहिल्यापासून धरला असून उद्योगांतून एकूणच समाजाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. ‘सीआयआय''चे अक्षय बन्सल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे वरिष्ठ समूह संचालक विक्रम सराफ यांनीही ऑनलाईन मार्गदर्शन केले. सीए सतीश डकरे यांनी स्वागत केले. कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त संजय माळी यांनी आभार मानले. हर्षवर्धन पंडित यांनी हा संवाद आणखी खुलवला.
१९४४५
लोकराजा राजर्षी शाहूंना
आदरांजलीचा संदेश पोचवा
पालकमंत्री सतेज पाटील यांचे कोल्हापूरकरांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त १८ एप्रिल पासून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शुक्रवारी (ता. ६) राजर्षी शाहू महाराजांना अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा सविस्तर आढावा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज शाहू मिल येथे घेतला. यावेळी शुक्रवारी सकाळी दहा वाजता शंभर सेकंद एकाच वेळी स्तब्धता पाळून लोकराजाला आदरांजली वाहूया. हा संदेश सर्वांपर्यंत पोचवा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, आदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, ऋषीकेश केसकर, प्राचार्य महादेव नरके, उदय गायकवाड, प्रसन्न मालेकर, जयदीप मोरे, अमरजा निंबाळकर आदी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री श्री. पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळास भेट देऊन अभिवादन कार्यक्रमाची माहिती घेतली. या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
१९४४३
रेल्वेतून येणाऱ्या
पर्यटकांचे स्वागत
राजर्षी शाहू टर्मिनस पायाभरणी दिन
कोल्हापूर, ता. ४ ः येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसच्या पायभरणीला ३ मेला १३४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वांतर्गत कोल्हापुरात रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत रात्री साडेआठला पेढे वाटून करण्यात आले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची दूरदृष्टी आणि दुर्दम्य आशावाद यामुळे कोल्हापूरचा विकास झाला. याचाच एक भाग म्हणजे ३ मे १८८८ रोजी कोल्हापूर- मिरज रेल्वे स्थानकाच्या पायाभरणीचा दिवस. या दिनाचे औचित्य साधून पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड, हिल रायडर्स संस्थेचे प्रमोद पाटील, ‘क्रेडाई‘चे आदित्य बेडेकर, जयदीप मोरे, बळीराम वराडे, विश्वजित सडोलकर तसेच शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
आज कँडल मार्च
कोल्हापूर ः राजर्षी शाहू स्मृती शताब्दी पूर्वसंध्येला उद्या (ता. ५) सायंकाळी सात वाजता दसरा चौक ते शाहू समाधी स्थळ या मार्गावर कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतीला या अनोख्या उपक्रमातून अभिवादन करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापुरातील सर्व समाजाच्या बोर्डिंगमधील विद्यार्थी उपस्थित राहून शाहू महाराजांना आदरांजली वाहणार आहेत.
भवानी मंडपात उद्या
होणार युवा जागृती पथनाट्ये
कोल्हापूर ः राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त ‘वारसा राजर्षी शाहूंचा, जागर युवाशक्तीचा’ या माध्यमातून भवानी मंडपात सकाळी आठ वाजता पथनाट्य सादरीकरण होणार आहे.शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, शिवाजी विद्यापीठराष्ट्रीय सेवा योजना व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध महाविद्यालय व माध्यमिक शाळांच्या माध्यमातून शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर आधारित १०० मिनिटांचे पथनाट्य सादरीकरण या वेळी होईल. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनाचे १००० स्वयंसेवकही सहभागी होणार आहेत.
मुस्लिम धर्मगुरू,
मशिद प्रमुखांची आज बैठक
कोल्हापूर ः राजर्षी शाहू स्मृती शताब्दी अभिवादनाच्या पार्श्वभूमीवर उद्या (गुरुवारी) मुस्लिम धर्मगुरू व मशिद प्रमुखांची संयुक्त बैठक होणार आहे. मुस्लिम बोर्डिंग येथे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुस्लिम बोर्डिंगच्या वतीने केले आहे.
राज्य नाट्य स्पर्धेचे उद्या
अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूर ः राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन होईल. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्षास अभिवादन म्हणून स्पर्धेची ही अंतिम फेरी कोल्हापुरात होत आहे.यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवनचरित्रावर आधारित ''राजर्षी आणि संगीतसूर्य-नाट्यनगरीच्या नवलकथा'' हा कार्यक्रम सादर होणार आहे. संकर्षण कऱ्हाडे, राजू राऊत, संपदा माने आणि रवींद्र भट यांचा सहभाग आहे. कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहे. दरम्यान, उद्या (गुरुवार) पासून खासबाग मैदानात ‘उत्सव लोकवाद्यांचा‘ या कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे.
शंभर सेकंद व्हिडिओची
सोशल मीडियावरही धूम
कोल्हापूर ः राजर्षी शाहूंना तमाम कोल्हापूरकर शंभर सेकंद स्तब्धता पाळून एकाच वेळी आदरांजली वाहणार आहेत. या कार्यक्रमाचे आवाहन करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर होऊ लागला आहे. प्रसिध्द जाहिरातकार अनंत खासबारदार, ऐश्वर्य मालगावे यांच्या संकल्पनेतून हा व्हिडिओ तयार झाला आहे. हा व्हिडिओ तयार करताना दाभोळकर कॉर्नर दहा मिनिटे स्तब्ध ठेवून शूटिंग पूर्ण करण्यात आले.
‘जागर शाहू कर्तृत्वा’चा वर
आज शंभर ठिकाणी व्याख्याने
कोल्हापूर ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता जिल्ह्यात ‘जागर शाहू कर्तृत्वाचा’ या विषयावर एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे आयोजन केले आहे.
विवकानंद महाविद्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात मुख्य व्याख्यान होणार असून अर्थ व कृषी तज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात संवाद साधतील. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हे चंदगड येथील आर. बी. माडखोलकर महाविद्यालयात व्याख्यान देणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कराड येथील एस. जी. एम कॉलेजमध्ये व्याख्यान देतील.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55063 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..