
पूरस्थितीचे उपाय कागदावरच
महापूर उपाययोजनांकडे कानाडोळा
पूरग्रस्त समितीची नाराजी; जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याची खाडेंची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः पूरस्थितीच्या उपाय योजनांकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. महापुरानंतर झालेल्या चर्चेला, उपाय योजनांची कोणती ही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप केला जात आहे. खुद्द जिल्हाधिकारी यांचीही भेट मिळत नसल्याने पूरग्रस्त समितीचे समन्वयक बाजीराव खाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या सोबत नसेल किमान लोकप्रतिनिधीं सोबत उपाय योजनांच्या विषयावर बैठक घ्यावी, अशीही मागणी खाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली.
महापूर आल्यानंतर तो का आला याबाबतची कारणे शोधली जातात. मात्र त्यासाठी आवश्यक शास्त्रीय अहवाल तयार करण्यासाठी समिती अद्याप नेमलेली नाही. ती तातडीने नेमण्याची मागणी पूरग्रस्त समितीने केली होती. एकाच व्यासपीठावर येवून चर्चा करावी, तज्ज्ञांशी बोलून याबाबतचा अहवाल तयार करावा, तो शासनाला पाठविण्यापूर्वीच लोकांसाठी जाहीर करून अधिकच्या शिफारशींचे स्वागत करावे, त्यानंतरच अहवाल शासनाला सादर करावा, अशी मागणी केली होती. मात्र समितीच नसल्यामुळे अहवाल सादर करण्याचा प्रश्नच येत नसल्यानेही पूरग्रस्त समितीने नाराजी व्यक्त केली आहे. मोऱ्या,पूल, आवश्यक ठिकाणी पाईप टाकण्याचे काम त्वरीत सुरू केले असते तर भविष्यात महापूर आल्यास त्याचे पाणी निचरा होण्यास मदत झाली असती. मात्र तेही काम जिल्हा प्रशासनाकडून केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
निव्वळ मानव निर्मित चुकीच्या विकास कामांमुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. पूरग्रस्त गावांच्या सरपंचांच्या सहभागाने पूरग्रस्त समितीची स्थापना केली आहे. सुमारे १३० ग्रामपंचायतींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ठराव पाठविले आहेत. मात्र तरीही जिल्हाधिकारी यांना पूरग्रस्त समितीला भेट देणेही ही शक्य झाले नाही. पूरग्रस्त समितीने यासाठी एक दिवस उपोषण ही केले. तरीही त्यांच्याकडे दुर्लेक्ष करण्यात आल्याचेही समन्वयक खाडे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55093 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..