चित्रकथा आभाळाएवढ्या राजाची... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकथा आभाळाएवढ्या राजाची...
चित्रकथा आभाळाएवढ्या राजाची...

चित्रकथा आभाळाएवढ्या राजाची...

sakal_logo
By

चित्रकथा आभाळाएवढ्या राजाची...

गुलामगिरीतून शुद्रातिशुद्रांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन कार्य करणारे महाराजांचे महाराज, अशी राजर्षींची जगभरात ओळख. त्यांचे हे सारे लोकाभिमुख कार्य नव्या पिढीसमोर यावे, या उद्देशाने ‘लोकराजा राजर्षी शाहू’ ही दूरचित्रवाणी मालिका २० वर्षांपूर्वी दूरदर्शन आणि १० वर्षांपूर्वी साम टीव्हीवरून प्रसारित झाली. ही मालिका साकारत असताना आभाळाएवढ्या या लोकराजाचे कार्यकर्तृत्व अभ्यासताना अनेक दिग्गजांचा सहवास लाभला आणि त्यातून राजर्षी शाहूंचे कार्य किती अतुलनीय होते, याची प्रचिती आली. आजही राजर्षींच्या विचारांचा जागर होऊन ते विचार प्रत्यक्षात अमलात आणणे आवश्यक असून लोकराजा राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- सतीश रणदिवे, दिग्दर्शक
............
लोकराजा राजर्षी शाहू दूरचित्रवाणी मालिका करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या चित्रपट कारकिर्दीचे सार्थक झाल्यासारखे मला वाटते. मी केलेल्या २० ते २२ चित्रपटांची नावे न सांगता ‘लोकराजा राजर्षी शाहू’ या मालिकेचा दिग्दर्शक म्हणून सांगताना मला जास्त आनंद होतो. या मालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील समकालीन सुधारकांचा, प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदींच्या कार्याचा आढावाही घेतला.
सामाजिक परिवर्तनातून ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ ही मानवतावादी चळवळ कशी आकार घेते, हे अप्रत्यक्षरित्या अनुभवता आले. डॉ. रा. कृ. कणबरकर,
डॉ. विलास संगवे, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला, जयवंत वालावलकर आणि प्रबोधनकारांचे काम करणारे मोहन गोखले आम्हाला खास बोलावून त्यांनी वडिलांविषयी सांगितलेल्या आठवणी ऐकणे, हे भाग्याचे क्षण या मालिकेच्या प्रक्रियेत अनुभवता आले. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीरामजी यांनी शाहूंच्या विचारकार्याचा प्रभाव त्यांना प्रेरणादायी कसा झाला, या विषयी सांगितलेले अनुभवही बरेच काही शिकवून गेले. शाहू चरित्रकार कृ. गो. सूर्यवंशी यांच्या ‘राजा आणि माणूस’ हा पुस्तक ग्रंथ आधारभूत मानून त्यातील संदर्भातून अनेक प्रसंग मांडले. त्यासाठी चंद्रकांत जोशी, जयवंत वालावलकर यांनी संहिता विस्तारत मदत केली. भास्कर जाधव लिखित ‘संभवामी युगे युगे’ या शाहूंवरील नाटकातील काही प्रसंगांचाही काही भागात उपयोग केला. माझ्यासह सर्व कलाकार, तंत्रज्ञांनी जीवाची मेहनत करून, राजर्षी शाहूंच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
डॉ. रमेश जाधव यांची राजर्षी शाहूंच्या जीवनावरील ‘लोकराजा’ ही लेखमाला वाचून पुण्यातील नाट्य निर्माते (कै) जयवंत वालावलकर यांनी त्यावर दूरचित्रवाणी मालिका निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रेरित होवून ते कोल्हापुरात आले. डॉ. रमेश जाधव, बाबा नेसरीकर, डी. बी. पाटील, लेखक-दिग्दर्शक दिनकर पाटील, डॉ. रा. कृ. कणबरकर, भिकशेठ पाटील, व्ही. बी. पाटील आदी शाहूप्रेमींना एकत्र आणून केवळ मालिका या एकाच उद्देशाने राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठानची स्थापना केली. मालिकेची संकल्पना १९९३ ची. पण पुढे जवळजवळ १० ते १२ जयवंत वालावलकर यांनी कोल्हापुरात राहून पाठपुरावा सुरू ठेवला. या काळात ते कित्येकदा आजारी पडले. अपघातात हात मोडला. मात्र, ते थकले नाहीत. मालिका दूरदर्शनच्या पडद्यावर आणणे, याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने व सूतगिरणी, दूधसंस्थांकडून निधी संकलित केला. पुढे युती शासनाकडून ५० लाखांचा निधी मिळाला व चित्रीकरणाला वेग आला.
सहा जून २००२ पासून मालिकेचे प्रसारण सुरू झाले. आघाडी सरकारकडून मिळालेले ५० लाख रुपये दूरदर्शनची ५७ भागांची फी भरण्यातच गेले. ही फी रिफंड न झाल्याने मालिका अर्धवट अवस्थेत ५७ भागानंतर बंद पडली. शाहूंच्या अंतकाळातील महत्त्‍वाचे प्रसंग पुन्हा पब्‍लिक फंड गोळा करून २०१२ ला साम टीव्हीवर पुढील भागांसह एकूण ६८ भाग दाखवले.

राजर्षींच्या जीवनातील महत्त्‍वपूर्ण प्रसंग
राजर्षींच्या जीवनातील अनेक महत्त्‍वपूर्ण प्रसंगांचा मालिकेत समावेश आहे. राजर्षींनी घेतलेल्या काही क्रांतिकारी निर्णयांवर काहींचे आक्षेपही होते. पण, जे आहे,
ते वास्तव स्वीकारूनच हे प्रसंग मालिकेसाठी चित्रीत झाले. मालिकेसाठी १०० वर्षांपूर्वीचा सेट जसाच्या तसा उभा करण्यासाठी प्रतिष्ठानसह येथील शाहूप्रेमींनी मदत केली. त्यामुळे मालिकेत दुर्मिळ गोष्टी प्रत्यक्ष पाहता येतात. शाहू महाराजांनी मोट ओढली. अस्वलाबरोबर झुंज केली. त्याकाळी वनसंपदा संवर्धनाला महत्त्व दिले, त्यामुळे वन्यजीवांची वाढ झाली. घोडेस्वारी केली. साठमारीसाठी खास मैदान बांधले, तर दक्षिण आफ्रिकेतील स्टेडियमच्या धर्तीवर कोल्हापुरात खासबाग मैदान बांधले. त्याची रचना व त्या मैदानात झालेली पहिली कुस्ती या मालिकेत आहे. या शिवाय २०० घोडे, १६ उंट, पाच हत्ती, तीन रथ यांचे पालखी दरबारी, भालदार-चोपदार, वाड्यातील सजावटी, जुने लाकडी फर्निचर असा मोठा सेट या मालिकेसाठी वापरला गेला. गुजरी व जुना राजावाडा परिसरातून महाराजांची निघालेली मिरवणूक, राज्याभिषेकाला जुना राजावाड्यात केलेली सजावट यासाठी चित्रीकरणावेळी बदल करावे लागले. पण वास्तववादी मालिका करण्यासाठी निष्णात कलावंतांनी आपले कसब पणाला लावले. त्यामुळे संस्थानकालीन वास्तवदर्शी मालिका तयार होऊ शकली.
मालिका पुन्हा प्रसारित करताना कानपूरमध्ये कुर्मी समाजाने दिलेल्या ‘राजर्षी’ या उपाधीच्या कार्यक्रमाचा प्रसंगाचाही मालिकेत समावेश झाला. २०१० ला सुमारे
९१ वर्षांनंतर हा सुवर्णक्षण पुन्हा कानपूरवासीयांनी चित्रीकरणाच्या निमित्ताने अनुभवला. अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे १३ वे अधिवेशन १९ एप्रिल १९१९ ला झाले. त्याचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज होते. याच अधिवेशनात त्यांना महासभेने राजर्षी ही उपाधी बहाल केली होती. कृतज्ञतेचे तेच भारावलेले वातावरण पुन्हा चित्रीकरणाच्या निमित्ताने अनुभवता आले. चित्रीकरणासाठी लखनौ, बरेली, अलाहाबाद इथून शेकडो नागरिक उपस्थित होते. चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातून आमची ६० जणांची टीम गेली होती.

सिनेमासाठीही प्रयत्न
अनेक अडचणींवर मात करत केवळ ध्यास म्हणून शाहूप्रेमींनी मालिकेच्या केलेल्या धडपडीला यश आले. अवघे १० हजार रुपये घेऊन मालिकेसाठी जुळवाजुळव सुरू झाली. समिती प्रत्येक सहकारी संस्था, उद्योग समूहाच्या भेटी घेत दारोदार फिरत राहिली. प्रत्येक ठिकाणी शाहू महाराजांचे कार्य टीव्हीवर दिसले पाहिजे.
या तळमळीने शाहू महाराजांविषयी नितांत आदर व्यक्त करणाऱ्या घटकांनी प्रतिष्ठानला मदत दिली आणि मालिका साकारली. सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे चित्रीकरणासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह छत्रपती घराण्याने केले. मालिकेचे कार्यकारी निर्माते व्ही. बी. पाटील, शाहूंची भूमिका साकारणारे राहुल सोलापूरकर आणि दिग्दर्शक या नात्याने मी ही मालिका हिंदीमध्ये डबिंग करून देश पातळीवर कशी दाखवता येईल, तसेच एखाद्या मराठी वाहिनीवरून कशी पुन्हा प्रसारित करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याशिवाय याच मालिकेतील प्रसंगांची योग्य गुंफण करत अडीच तासांचा सिनेमा बनवणेही शक्य आहे. या माध्यमातूनही शाहूंचा विचार सर्वदूर पोचवता येणे शक्य होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55171 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top