
सामाजिक सलोखा
कोल्हापूरच्या सामाजिक सलोख्याचे एक पाऊल पुढे...
कोल्हापूर, ता. ५ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समतेचा वारसा येथील हिंदू-मुस्लिम नव्हे तर सर्वच समाजांनीही कायम जोपासला आहे. देशभरात विविध कारणांनी विद्वेषाचे वातावरण तयार झाल्यानंतरही कोल्हापूरने त्याला सातत्याने छेद देण्याचे काम केले आहे. त्याची पुन्हा एकदा प्रचिती भोंग्यांच्या प्रकरणावरून आली.
दोन वर्षांच्या कोरोनाच्या तडाख्यानंतर आणि आता महागाईने होरपळून जात असताना ‘ही’ बाब आपल्याला परवडणारी नाही हे नागरिकांनी मनोमनी ठाणले असल्यानेच कोल्हापुरातील सामाजिक वातावरण निकोप राहिले. यातून कोल्हापूरच्या सामाजिक सलोख्याने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सध्याच्या वातावरणात ही फार मोठी बाब आहे.
शहराची रचना पाहिली की मुस्लिम बहुसंख्य असलेले अनेक भाग मध्यवस्तीत आहेत. त्यांच्या भोवताली अन्य धर्मीयांचा रहिवास आहे. यातूनच एकमेकांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची प्रथा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. दिवाळीसह विविध हिंदू तसेच अन्य धर्मीयांच्या सणांना येथील मुस्लिम समाजाकडून शुभेच्छा दिल्या जातात, तर रमजानसारख्या मुस्लिस बांधवांच्या सणामध्ये इतर सारे सहभागी होत असतात. तसेच फळ, सुका मेवा, किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्या मुस्लिम बांधवांना कधी परके समजून त्यांच्याकडून खरेदी करणे इतर धर्मीयांनी बंद केलेले नाही. वेगवेगळ्या घटनांवेळीही मदतीसाठी धर्म पाहिला जात नाही. यातूनच येथील सामाजिक वीण सतत अधिक घट्ट होत आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार पारंपरिक जयंती साजरी करण्यात आली. विविध फलक लावले गेले, मोठमोठ्या मिरवणूक काढण्यात आल्या. रमजान ईदही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व कालावधीत वातावरण सोहार्दपूर्ण राहिले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांची ताकदच कारणीभूत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
चौकट
दोन्हीकडून समजूतदारपणा
भोंग्यांवरून महाराष्ट्रात वातावरण तापले असताना येथे मात्र टोकाची भूमिका घेतली गेली नाही. त्यासाठी स्वतःहून मुस्लिम समाजाने घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. अनेक ठिकाणचे भोंगे दोन दिवसांपासूनच कमी आवाजात लावले जात होते. काही ठिकाणी बंद केले गेले. यातून एकमेकांप्रती आदरच दाखवला गेल्याचे दिसून येते. हा समजूतदारपणा दोन्हीकडून घेतल्याने तणावाचे वातावरण तयारच झाले नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55178 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..