राजर्षी शाहू आणि इनोव्हेशन्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहू आणि इनोव्हेशन्स
राजर्षी शाहू आणि इनोव्हेशन्स

राजर्षी शाहू आणि इनोव्हेशन्स

sakal_logo
By

राजर्षी शाहू आणि इनोव्हेशन्स...

अस्पृश्‍यता निवारणासाठी ठोस पाऊल उचलणारा, दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ देत समाजाच्या मुख्य प्रवाहात घेणारा, सक्तीच्या शिक्षणातून समृद्धीची वाट दाखविणारा, धरण बांधून हरितक्रांती घडवणारा, समतेसाठी आग्रही भूमिका बजावणारा, जनतेची सांस्कृतिक भूक भागविणारा, लोकराजा राजर्षी शाहूंच्या कार्याचा वेध घेताना ते किती उत्तुंग आहेत, याची हमखास प्रचिती येते. समाजातील सर्वच घटकांचा शाश्वत विकास, हेच लोकराजा शाहूंच्या राज्यकारभाराचे मुख्य सूत्र राहिले आणि म्हणूनच हा लोकराजा शंभर वर्षांनंतर आजही लोकाभिमुख राज्यकारभारासाठी आदर्श आहे. सामाजिक सुधारणांबरोबरच एकूणच कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. पण, त्याचवेळी अनेक ‘इनोव्हेशन्स'' त्यांनी त्या काळात राबवली आणि विज्ञानाबरोबरच तत्कालीन तंत्रज्ञानाचा आधार घेत ती यशस्वीही केली.
............

शाहू मिल, राधानगरी धरण
* सहकार तत्त्वावरील श्री शाहू छत्रपती मिल, शाहूपुरी व्यापारी पेठ, राधानगरी धरणापासून ते पारंपरिक पिकांना फाटा देत चहा- कॉफीचा मळाही राजर्षी शाहूंनी कोल्हापुरात पिकवला. राधानगरी धरणाचाच विचार केला तर वैशिष्ट्यपूर्ण स्वयंचलित दरवाजाचं तंत्र भारतरत्न एम. विश्‍वेश्‍वरय्या यांचं. धरण भरले की पाण्याचा दाब या दरवाजावर पडतो. दरवाजा आपोआप उचलला जातो. पाठोपाठ पाण्याचा विसर्ग होतो आणि धरणावरचा पाण्याचा अतिरिक्त दाब कमी होतो, अशी ही रचना आहे. त्यासाठी दरवाजांना प्रत्येकी ७० टन वजनाचे सिमेंटचे ब्लॉक बांधले आहेत. ते पाण्यात आहेत. पाण्याचा दाब कमी झाला की हे ७० टन वजनाचे ब्लॉक दरवाजांना पुन्हा मूळ जागी आणतात.


रंकाळा प्रदूषणमुक्तीला पर्याय धुण्याची चावी
* कोल्हापूर शहरातील धुण्याची चावी म्हणजे कपडे धुण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी किंवा त्यांना धुण्यासाठी एकाच ठिकाणी केलेली बहुआयामी योजना आजही कार्यरत आहे. आपल्याकडे आजही प्रदूषण करू नका, असे आवाहन केले जाते. मात्र, लोकांना पर्याय दिले जात नाहीत. परंतु, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठीचा शाहूकालीन पर्याय म्हणून आजही ही योजना मार्गदर्शक ठरते.

पहिला राजाराम बंधारा
* शेतीच्या सिंचनासाठी कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधले गेले. राजर्षी शाहूंच्या संकल्पनेतून पुढे छत्रपती राजाराम महाराजांनी पहिला बंधारा पंचगंगेवर बांधला. खोली, उतार, दोन्ही काठ मजबूत आणि आसपास विहिरींची संख्या अधिक, यानुसार जागेची निवड केली गेली. पावसाळा सुरू होण्यापूर्वी बंधाऱ्याचे बरगे काढले जातात. त्यासाठी बंधारा बांधकामात विशिष्ट रचना केली गेली.

स्वतंत्र पाटबंधारे खात्याची निर्मिती
* राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये संस्थानात सार्वत्रिक पाटबंधारे धोरण जाहीर करताना स्वतंत्र पाटबंधारे खात्याची निर्मिती केली आणि त्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला. नवीन विहिरी, जुन्या विहिरी, लहान- मोठे तलाव यांची तपशीलवार माहिती घेऊन त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली. नवीन योजना अमलात येत होत्या. नवीन विहिरी आणि तलावांच्या बांधकामास प्राधान्य देण्यात येऊ लागले. पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब थांबलाच पाहिजे, याकडे महाराजांनी लक्ष दिले. त्यामुळेच १९०६ मध्ये संस्थानात ११ हजार ७०० ‍विहिरी होत्या. त्यांची संख्या १९२० पर्यंत १२ हजार ८०० झाली. शेतकऱ्यांना जुन्या विहिरी दुरुस्त करण्यास आणि नवीन विहिरी काढण्यासाठी संस्थानकडून कर्जपुरवठा केला. शहापूर, रुकडी, शिरोळ या परिसरात २० नवीन तलाव बांधले, तर काही जुन्या तलावांची दुरुस्ती केली.


कलेला राजाश्रय देणारा राजा
* कलेला राजाश्रय देणारा राजा अशीही राजर्षींची ओळख. १९०२ मध्ये युरोप दौऱ्यावर असताना त्यांनी रोमन पद्धतीचे कुस्ती मैदान पाहिले आणि ते कोल्हापुरात बांधण्याचा निर्णय घेतला. कोल्हापुरात येताच त्यांनी जिवबा कृष्णाजी चव्हाण या ओव्हरसियरना कल्पना सांगितली आणि नाट्यगृहाचा व मैदानाचा आराखडा तयार करून घेतला. बांधकामाचं कंत्राट बाळकृष्ण गणेश पंडित यांना दिले. या थिएटरसाठी लोखंडी गर्डर्स परदेशातून मागविले. थिएटरची रचना, ध्वनियोजना, नाट्यगृहाच्या कोणत्याही कोपऱ्यातून प्रेक्षकाला नाटक स्पष्ट दिसावं, अशा बाबींत शाहू महाराजांनी जातीने लक्ष घातले. ऑक्‍टोबर १९१३ ला बांधकाम सुरू झाले आणि १९१५ मध्ये म्हणजे दोन वर्षांत ‘पॅलेस थिएटर’ आकाराला आले. किर्लोस्कर कंपनीचे ‘मानापमान’ हे नाटक ‘पॅलेस थिएटर’मध्ये पहिल्यांदा सादर झाले.

तोफा वितळवून शेतकऱ्यांसाठी नांगर निर्मिती
* पहिल्या महायुध्दाच्या काळात पोलादाची टंचाई जाणवू लागली आणि ब्रिटिशांनी भारतातील तोफा वितळवून त्यापासून शस्त्रनिर्मिताला प्रारंभ केला. मात्र, राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानातील तोफा वितळवून त्या शेतकऱ्यांसाठी नांगर निर्मितीसाठी किर्लोस्कर कंपनीला दिल्या. आधुनिक शेतीसाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट, होमिओपॅथी दवाखाना, पांजरपोळ, डिझेल पंपाचा वापर, मधूमक्षिका केंद्र, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार करत जातीनिहाय वसतिगृहे, हजारी फंड, शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज, सहकारातील विविध संकल्पना, उद्योगांतील अपघात कमी करण्यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना, दळणवळणासाठी पुलांबरोबरच रेल्वेस्थानक...अशी ही यादी मोठी आणि लांबलचक होणारीच आहे. एकूणच शाहू कार्याचा विचार करता अनेक नवीन संकल्पना या लोकराजानं प्रत्यक्षात आणल्या आणि आजही शंभर वर्षांनंतर त्या दिशादर्शक आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55189 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top