
सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम
सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व कायम
अत्याळ सेवा संस्था; प्रकाश पाटील गटाला सर्व १३ जागा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री लक्ष्मी विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीने झाली. सत्ताधारी प्रकाश पाटील गटाने वर्चस्व कायम राखताना सर्व १३ जागांवर विजय मिळविला. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल-पी. के. पाटील गटाची पाटी कोरीच राहिली. विरोधकांनी कर्जदार गटात सत्ताधाऱ्यांना चांगली लढत दिली पण, इतर गटांत विरोधकांचे पाणीपत झाल्याचे निकालावरुन दिसून येते.
सत्ताधारी प्रकाश पाटील गटाने शेतकरी विकास पॅनेलची रचना केली होती. त्याविरोधात सर्व विरोधक एकवटले होते. राष्ट्रवादी-जनता दल-पी. के. पाटील गटाने श्री लक्ष्मीकृपा परिवर्तन आघाडी उभारली होती. दोन्ही पॅनेलने मतदारांशी थेट संपर्क ठेवत प्रचारात मोठी चुरस निर्माण केली होती. मतदानातही ती टिकून राहिली. प्राथमिक शाळेच्या केंद्रावर चुरशीने १३३५ पैकी ११२३ मतदारांनी हक्क बजावला होता. मतदानानंतर अर्ध्या तासाने त्याच ठिकाणी मतमोजणी झाली. कर्जदार गटात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगली लढत दिली. एका जागेचा निकाल चिठ्ठीवर झाला. सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेलचे शंकर चोरगे व परिवर्तन आघाडीचे अवधूत आनंदा पाटील यांना समान ४९६ मते पडली. चिठ्ठीत शंकर चोरगे यांनी बाजी मारली. मात्र, अन्य चार गटात सत्ताधारी उमेदवारांनी ६८ ते १०९ पर्यंत मताधिक्याने विजय मिळविला.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी - कर्जदार गट- रामदास पाटील (५७५), विजय पाटील (५६४), प्रकाश पाटील (५५६), वसंत पाटील (५४६), सर्जेराव पाटील (५४२), विजय शिंदे (५३०), प्रताप मोहिते (५२९), शंकर चोरगे (४९६). महिला प्रतिनिधी- वैशाली माने (५८०), लता मळगेकर (५६७). अनुसूचित जाती-जमाती- ईश्वर कांबळे (६००). इतर मागास- यशवंत गुरव (६००). विशेष मागास प्रवर्ग- रामचंद्र गाडीवड्ड (६०४).
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55204 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..