
मोकाट गायींना मिळणार हक्काचा आसरा
19659
इचलकरंजी : शहरातील भटक्या गायी अशा नेहमी कळपाने फिरत असतात. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
मोकाट गायींना मिळणार हक्काचा आसरा
गोशाळेचे नियोजन; पालिकेतर्फे लक्ष्मी नारायण प्रतिष्ठानला २० गुंठे जागा
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ : शहरातील भटक्या गायींचा उपद्रव लवकरच कमी होणार आहे. येत्या चार महिन्यांत अशा भटक्या गायींच्या संगोपनासाठी २० गुंठे जागेत स्वतंत्र गोशाळा सुरू करण्यात येत आहे. पालिकेतर्फे लक्ष्मी नारायण गौसेवा प्रतिष्ठानला यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात अन्नासाठी मोकाट फिरणाऱ्या गायींना आता हक्काचा आसरा मिळणार आहे.
शहरास वाहतूक समस्या अधिक प्रमाणात भेडसावत आहे. त्यातच रस्त्यावर फिरणाऱ्याना भटक्या गायींमुळे वाहतुकीच्या अडथळ्यामध्ये आणखी भर पडत आहे. परिणामी, शहरात वरचेवर वाहतूक ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. भटक्या गायींच्या प्रश्नांवर उपाय म्हणून पालिकेने गायी सांभाळण्यासाठीचे प्रस्ताव मागितले होते. त्यामध्ये विविध सहा गोसेवा संस्थांनी प्रस्ताव दिले होते. त्यामध्ये २०१७ पासून पाठपुरवठा करणाऱ्या श्री लक्ष्मी नारायण गौसेवा प्रतिष्ठान संस्थेस डिसेंबर २०२१ मध्ये कृष्णानगर परिसरात जागा देण्यात आली. दरम्यान, या जागेचा करारचा कालावधी केवळ एक वर्ष असल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे. काही घटकांनी विरोध केल्यामुळे पाहिले दोन महिने वाया गेले आहेत. तर आणखी चार महिने गोशाळेच्या शेडच्या बांधकाममध्ये जाणार आहेत. त्यामुळे पालिकेकडून देण्यात आलेला एक वर्षाचा कालावधी हा अपुरा पडत आहे. तथापि, पुढील काळात त्याला मुदतवाढ मिळू शकते.
इचलकरंजी शहरात सुमारे २५० हून अधिक भटक्या गायी फिरत असतात. त्यामध्ये मालक असणाऱ्या गायींची संख्याही अधिक आहे. मात्र मालक केवळ त्यांच्या पासून मिळणाऱ्या लाभासाठी येत असल्याचे दिसून आले आहे. या गायी चाऱ्याचा शोधात फिरत असल्याने यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. या गायी रस्त्यावरून पळताना अथवा मुख्य चौक, रस्ते या ठिकाणी बसल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अनेकदा या भटक्या गायींच्या धडकेत दुचाकीस्वार, आठवडी बाजाराच्या ठिकाणी महिला गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
-----------
चौकट
मालकांचे सोयीस्कर दुर्लक्ष
नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेत तत्कालीन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी एक बैठक बोलवली होती. या वेळी अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी व पालिकेचे पदाधिकारी, मोकाट जनावरांचे मालकही उपस्थित होते. या वेळी गायी परत नेण्यासाठी मुदतही मागितली होती. परंतु सुमारे चार वर्षांनंतरही या गायींची मोकाटपणे भटकंती सुरूच आहे. तर मालकांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.
-------------
कोट
शहरात भटक्या गायींचे प्रमाण वाढण्यात आपण स्वत: आपण जबाबदार आहोत. कारण नागरिकांनी गायींना रस्त्यावर चारा देणे बंद करावे. असे केल्यास गायींचे मालक गायींना मोकाट सोडणे बंद करतील.
- शिवाजी व्यास, लक्ष्मी नारायण गौसेवा प्रतिष्ठानचच
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55340 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..