राजर्षी छत्रपती शाहू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी छत्रपती शाहू
राजर्षी छत्रपती शाहू

राजर्षी छत्रपती शाहू

sakal_logo
By

लोगो- कृतज्ञता पर्व

१९७७८

शंभर वर्षांनंतरही राजर्षींचे कार्य प्रेरणादायी
डॉ. यशवंतराव थोरात ः कृतज्ञता पर्वांतर्गत एकाच दिवशी शंभर ठिकाणी व्याख्याने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : जनतेशी एकरूप होऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे एकच राजे झाले ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्यामुळे शंभर वर्षांनंतरही त्यांचे जीवन आणि कार्य आपल्याला प्रेरणा देणारे आहे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अर्थ व कृषितज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज व्यक्त केले. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्ह्यात आज सकाळी ‘जागर शाहू कर्तृत्वा’चा या विषयावर शंभर व्याख्याने झाली. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठात श्री. थोरात यांनी ‘राजर्षी शाहू छत्रपती जीवन व कार्य’'' या विषयावर संवाद साधला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. थोरात म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे दरबारात वाढले नाहीत. प्रजेसोबत वाढले. हेच काम छत्रपती शाहू महाराज यांनीही केले. जनतेत राहून जनतेची सेवा करणारे हे राजे होते. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले होते. महाराजांच्या तत्कालीन समाजविषयक धोरणांचा समाजावर काय प्रभाव पडला आहे? यावर संशोधकांनी, अभ्यासकांनी जरुर प्रकाश टाकावा. शाहूंनी मदत केलेल्या कुटुंबांतील पिढ्या सध्या काय करत आहेत. त्यांच्यावर शाहू विचारांचा काय परिणाम झाला आहे. त्याचा संशोधकांनी अभ्यास करावा.’’
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे, मानवतावादाचे, समाज विषयक विचार थांबता कामा नये. ते विचार प्रत्यक्ष कृतीत यावेत. केंद्र व राज्य सरकारने शाहू विचारांवर कार्यरत रहावे. तीच महाराजांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.’’
डॉ. पवार म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी, सत्तेचा राजदंड खऱ्या अर्थाने बहुजनांच्या उत्थानासाठी वापरला. हा राजदंड वापरणारे ते एकमेवाद्वितीय राजे होते. तत्कालीन सामाजिक नकाशा बदलण्याचे काम शाहू महाराजांनी केले. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. शाहू महाराजांचे विचार तरुणाईने तळागाळापर्यंत पोचवावेत.’’
दरम्यान, शाहीर सदाशिव निकम यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. भारती पाटील उपस्थित होते.

..तर देशाचा सामाजिक
नकाशा बदलला असता
अठराव्या शतकात छत्रपती शाहू महाराज दिल्लीच्या गादीवर असते, तर देशातील सामाजिक नकाशा बदलला असता. केवळ विचार केला तरीही सर्व देशात सामाजिक ऐक्‍यासह प्रगतीचा आलेख डोळ्यांसमोर उभा राहतो. आता हाच विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपली असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.

१९७५४
राजर्षी शाहू महाराजांवर
आधारित कॅलेंडरचे प्रकाशन
शासकीय तंत्रनिकेतनला आज मंत्री सामंत देणार भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांवर आधारित कॅलेंडरचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. ऑल इंडिया जेम्स अँड डोमेस्टिक कौन्सिल व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त हे कॅलेंडर तयार केले आहे.
कॅलेंडर प्रकाशन समारंभ जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाला. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, सचिव माणिक जैन, खजानिस जितेंद्र राठोड, संचालक संजय चोडणकर, अशोक झाड, विजयकुमार भोसले, कुमार दळवी व राजू चोपडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, येथील शासकीय तंत्रनिकेतन व जिल्हा सराफ संघ यांच्‍या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या ‘डिप्लोमा इन व्होकेशनल ज्वेलरी डिझाईन’ विभागाला उद्या (ता.६) उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत भेट देणार आहेत. उद्या दुपारी १.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय गर्गे व सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले आहे.
दरम्यान, उद्या (ता. ६) संघाच्या सर्व पदाधिकारी, संचालक आणि सभासदांच्या वतीने प्रत्येक तालुका स्तरावर सकाळी १० वाजता १०० सेकंदांची स्तब्धता पाळणार येणार आहे. त्यानंतर सभासदांना शाहू महाराजांचे कॅलेंडर वाटप केले जाणार असल्याचे येथे जाहीर केले.

१९७८४
शिवाजी विद्यापीठात
शाहू चित्र प्रदर्शनाला प्रारंभ
कोल्हापूर, ता. ५ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष सप्ताहांतर्गत शाहू चित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन आज कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. कला विद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग हे या चित्र प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रामध्ये प्रदर्शन सुरू राहणार आहे. कोल्हापुरातील रा. शी. गोसावी कलानिकेतन, दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूट, कलामंदिर, सांगलीचे कला महाविद्यालय, शिणोली येथील कला महाविद्यालय आणि इस्लामपूर कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कलाकृती साकारल्या आहेत. काही स्थानिक कलाकारांसह आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय आचरेकर, मिलिंद मुळीक, संजय शेलार यांच्याही कलाकृती प्रदर्शनात आहेत.
कार्यक्रमाला प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. भारती पाटील, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. देविकाराणी पाटील आदी उपस्थित होते. डॉ. मानसिंग टाकळे आणि प्रा. हर्षवर्धन मणीपद्म यांचे विशेष सहकार्य मिळाले. दरम्यान, डॉ. जयसिंगराव पवार यांनीही या प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शन १२ मे पर्यंत सकाळी ११ ते ५ या वेळेत पाहण्यास खुले राहणार असल्याचे समितीप्रमुख डॉ. भारती पाटील यांनी सांगितले.


पीपल्स रिपब्लिकन कॅंडल मार्च १९७७९
स्केटिंग रॅली १९७९२

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55351 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top