
जिप निवेदन
१९७४७
कमी पट शाळांतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर नको
शिक्षण बचाव समिती ः जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन
कोल्हापूर, ता. ५ ः कमी पटाच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करू नये, यासह विविध मागण्यांचे निवेदन आज शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांना देण्यात आले. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र राजर्षी शाहू महाराजांची स्मृतिशताब्दी साजरी करत असताना दुसरीकडे मात्र वाड्या वस्त्यांवरील गोरगरीब बहुजन विद्यार्थ्यांना त्यांची शाळा हिरावून घेण्याचा निर्णय हा आत्मघाती ठरू शकतो, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील कमी पटाच्या ३१८ शाळांमधील विद्यार्थी हे पाच किलोमीटर अंतरावरील शेजारच्या मोठ्या शाळेमध्ये स्थलांतरित करणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. याअगोदर २०१८ साली महाराष्ट्र सरकारने कमी पटाच्या १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या ३४ शाळा बंद होणार होत्या. याविरोधात शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीने डॉ. एन. डी. पाटील व डी. बी. पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापुरात चार महिने जन आंदोलन केले होते. त्यानंतर शाळा बंद न करण्याचा निर्णय झाला होता. याबाबत कृती समितीचे सदस्य व शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी यांचा संबंधित शाळांना भेटी देऊन संयुक्त सर्व्हे झाला होता, असे असताना अवघ्या तीन-चार वर्षांतच जिल्हा परिषदेने पूर्ण उलटा निर्णय घेणे हे योग्य नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, वसंत पाटील, बाबासाहेब देवकर, अतुल दिघे, मधुकर पाटील, दिलीप माने आदींचा समावेश होता.
मागण्या अशा
- कमी पटाच्या शाळांमधील विद्यार्थी स्थलांतरित करू नये
-वाहतुकीसाठीचा २० कोटींचा निधी या शाळांवर खर्च करावा
-शिक्षकांच्या उपस्थिती इतर तक्रारी यासाठी इतर उपाययोजना कराव्या.
-कमी विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक ठेवणे यामध्ये न्यूनगंड बाळगणे चुकीचा आहे.
- या विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची मागणी कोणीही केलेली नाही, हा एकतर्फी निर्णय मागे घ्यावा.
-या शाळांसाठी राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने अभियान चालवावे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55412 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..