
जिप बैठक
१९७८०
पंचगंगा प्रदूषणमुक्तीची अंमलबजावणी करा
---
खासदार प्रा. संजय मंडलिक; जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती सभा
कोल्हापूर, ता. ५ ः पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसह अन्य योजनांची कामे आराखड्यानुसार पूर्ण करून या कामांची उद्दिष्टपूर्ती करा, अशा सूचना खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिल्या. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेत ही बैठक झाली.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या २०२२-२३ मधील आराखड्यानुसार सर्वच घटकांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी संबंधित यंत्रणांना कडक सूचना द्याव्यात, अशा सूचना दिल्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा तीनमधील सर्व अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करा, असे सूचित केले. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमात लाभार्थ्यांना वेळेत अनुदान वाटप करावे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०२२-२०२३ मध्ये नियोजित गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रम आराखडा तत्काळ मान्यता घेऊन पूर्ण करावा, असेही प्रा. मंडलिक यांनी सांगितले.
सध्या लाभार्थीस मिळणारे अनुदान कमी असल्याने ते वाढवून मिळण्याचा ठराव केला. थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची प्रगती व कामातील येणाऱ्या अडचणींचा आढावा प्रशासकांनी दिला. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करावी, यासाठी शासनस्तरावरून काही मदत आवश्यक असल्यास त्याचा पाठपुरावा करण्याची ग्वाही प्रा. मंडलिक यांनी दिली.
जिल्हा परिषदेला मिळालेल्या विविध पुरस्कारांबद्दल प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. या वेळी आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
विविध सूचना
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सातारा-कागल रस्ताकामाची प्रक्रिया लवकर पूर्ण करून काम सुरू करण्याची सूचना करण्यात आली. समग्र शिक्षा अभियान, बीएसएनएल, रेल्वे, महावितरण विभाग यांना कामाची प्रगती मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कायम ठेवण्याची सूचना केली. शेतीसाठी २४ तास वीज द्यावी, जातनिहाय जनगणना सर्वेक्षण सुरू करण्याचा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, २०२१-२२ प्रमाणे आकृतिबंध कायम ठेवून केंद्र सरकारने पूर्ववत सुरू ठेवण्याचा ठराव केला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55448 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..