मुंबई कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई कार्यक्रम
मुंबई कार्यक्रम

मुंबई कार्यक्रम

sakal_logo
By

१९७९०


मुंबईत राजर्षी शाहू स्मारक भवन उभारू
मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा; खेतवाडीतील राजर्षी शाहू स्मृतिस्तंभाचे उद्‍घाटन
मुंबई, ता. ५ : राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि वारसा जपण्यासाठी मुंबईत लोकराजाचे स्मारक आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली. खेतवाडी (वरळी) येथे आयोजित राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्त उभारलेल्या स्मृतिस्तंभाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. वरळी येथे कोल्हापूर भवन उभारण्याची घोषणा त्यांनी केली. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज मालोजीराजे छत्रपती तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. खेतवाडीतील गल्ली क्रमांक १३ येथील पन्हाळा लॉज ज्या ठिकाणी होते तेथे १२ फुटांचा स्मृतिस्तंभ उभारला असून त्याचे मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराज आणि माझे पणजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची मैत्री होती. १०० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी राजर्षींची आणि त्यांची भेट झाली होती. १०० वर्षांनंतर मला या कार्यक्रमाला उपस्थित राहायची संधी मिळतेय ही भाग्याची गोष्ट आहे. आजही मी कोल्हापुरात जातो तेव्हा तेथील एकेक वास्तू आणि संस्था राजर्षींच्या कार्याची प्रचिती देतात. १०० वर्षांनी राजर्षींची आठवण काढण्यासारखे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी समितीचे सदस्य मला भेटले. त्यांनी स्मृतिस्तंभाची कल्पना मांडली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही संकल्पना मूर्त स्वरुपात आणली. या सर्वांचे काम अभिनंदनीय आहे. राजर्षी शाहू महाराजांचे निधन खेतवाडीतील पन्हाळा लॉजवर झाले. त्यांची स्मृती येथे असावी अशी शाहूप्रेमींची अपेक्षा आहे. हीच अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही आहे.’’
मुंबईत राजर्षी शाहूंचे स्मारक आणि स्मृतिसंग्रहालय उभारण्यात येईल. विशेषत: वरळी, गिरगाव, दादर परिसरात कोल्हापूरवासीयांची संख्या लक्षणीय आहे. त्यांच्यासाठी वरळी येथे कोल्हापूर भवनही उभारण्यात येईल. स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभरात या कामांना मूर्त रूप देऊया, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘राजर्षी शाहूंनी केवळ संस्थानापुरता विचार केला नाही तर, संपूर्ण देशाला दिशा दिली. त्यांचा देहान्त झाला त्याठिकाणी स्तंभ उभारत आहे, ही समाधानाची बाब आहे.’’
मालोजीराजे छत्रपती म्हणाले, ‘‘स्मृतिशताब्दी वर्षात जेथे त्यांचा देहान्त झाला तेथे स्मृतिस्तंभ असावा अशी शाहूप्रेमींची अपेक्षा होती. यानिमित्त पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती केली. त्यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्णत्वाला गेले.’’
शाहीर दिलीप सावंत यांच्यासह त्यांच्या पथकाने शाहिरी पोवाडा सादर केला. मुंबईतील कोल्हापूरवासीय उपस्थित होते. दरम्यान १०० सेकंद स्तब्ध उभे राहून राजर्षी शाहूंना आदरांजली वाहिली. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार अनिल देसाई, माजी आमदार चंद्रदीप नरके, राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीचे अध्यक्ष
वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, बबनराव रानगे, अवधूत पाटील, श्रद्धा जाधव आदी उपस्थित होते.

ठाकरे-छत्रपती घराण्याचा ऋणानुबंध
मालोजीराजे छत्रपती यांनी छत्रपती आणि ठाकरे घराण्याच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे प्रबोधनकारांचे पणतू आणि मी राजर्षी शाहूंचा खापरपणतू आहे. राजर्षी शाहूंची आणि प्रबोधनकारांची १०० वर्षांपूर्वी आजच्या दिवशी झालेली भेट आणि आजची त्यांच्या वंशजांची भेट हा अनोखा योग आहे. हे ऋणानुबंध कायम आहेत.’’

राजर्षींचे नाव मोठे
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘राजर्षी शाहूंचे यंदा स्मृतिशताब्दी वर्ष साजरे होत आहे. यानिमित्त मुंबईत शाहू स्मारक व्हावे. हे मराठा बहुजनांच्या प्रबोधनाचे आणि चळवळीचे केंद्र व्हावे यासाठी प्रयत्न करावेत. मुंबईत कोल्हापूर भवनही उभारावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षी शाहू महाराज यांच्यातील वैचारिक वारसा आपण यानिमित्ताने जपू.’’

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निरोप
मुंबईत राजर्षी शाहू स्मारक आणि कोल्हापूर भवन उभारावे ही शाहूप्रेमींची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती राज्य सरकारने मान्य केली. तसा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55452 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top