
सतेज चषक फुटबॉल
फोटो
१९७६५
कोल्हापूर : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी फुलेवाडी विरुद्ध बालगोपाल यांच्या सामन्यातील एक क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
फुलेवाडीची बालगोपालवर मात
सकाळ वृत्त सेवा
कोल्हापूर, ता. ५ : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज फुलेवाडी आणि झुंजार क्लबने प्रतिस्पर्ध्यावर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला.
राजर्षी शाहू स्टेडियमवर चालू असलेल्या स्पर्धेत सकाळी झुंजार क्लब व कोल्हापूर पोलिस यांच्यात लढत झाली. झुंजारकडून शाहू भोईटेने १३ व्या मिनिटास गोल केला. त्यांच्या राजेश बोडेकरने २३ व्या मिनिटास मिळालेल्या संधीचा फायदा घेत गोल करत २-० अशी भक्कम आघाडी केली. पोलिस संघाकडून अजित पोवार याने ३४ व्या मिनिटास गोल करीत संघाची आघाडी २-१ ने कमी केली; परंतु त्यानंतर ४२ व्या मिनिटास झुंजारच्या ओंकार भोसलेने गोल करीत पुन्हा ३-१ अशी आघाडी केली. यानंतर पोलिसच्या अजित पोवार याने वैयक्तिक दुसरा गोल केला. त्यामुळे ३-२ अशी स्थिती झाली. यानंतर सामना रंगतदार झाला; परंतु याच गोल फरकावर झुंजार क्लबने विजय मिळवला.
दुपारच्या सत्रात फुलेवाडी क्रीडा मंडळ व बालगोपाल तालीम यांच्यात सामना झाला. बालगोपालकडून रोहित कुरणे, अभिनव साळोखे, आशिष कुरणे, अक्षय सरनाईक, ऋतुराज पाटील यांनी जोरदार चढाया केल्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. फुलेवाडीचे खेळाडू अक्षय मंडलिक, तेजस जाधव, रोहित मंडलिक, यासीन नदाफ यांनी वेगवान खेळ करत गोलसाठी प्रयत्न केले. १५ व्या मिनिटास अक्षय मंडलिक याने गोल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. तेजस जाधवने ४० व्या मिनिटास गोल करीत आघाडी २-० अशी केली. जादा वेळेत बालगोपालच्या रोहित कुरणे याने गोल करीत संघाची आघाडी २-१ ने कमी केली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, पण दोनही संघांना गोल करण्यात यश मिळाले नाही.
आजचा सामना
पाटाकडील (अ) विरुद्ध खंडोबा तालीम : दुपारी ४ वाजता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55478 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..