
ताल वाद्य विशेष वृत्त
१९७६३ व १९७७०
दुर्मिळ लोकवाद्यांचा अनमोल खजिना
---
महाताल महोत्सव; आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः विविध वाद्यांचे सूर, ताल, लय मानवी मनोरंजन घडविते म्हणून वाद्यांचे महत्त्व अमूल्य आहे. अशा वाद्य वादनाचा आनंद इतरांनाही देताना अनेकांच्या जगण्याला धीर लाभतो. अशा भावनेतून आदिवासी समाजात वाद्य वादनाला विशेष महत्त्व आहे. आदिवासींनी जोपासलेली जवळपास २० वाद्ये महाताल महोत्सवात लक्षवेधी ठरली आहेत. वाद्यांचे संकलन रतन चौधरी (ता. सुरगाणा, जि. नाशिक) यांनी केले आहे.
वाद्यांची गुणवैशिष्ट्ये अशी ः
थाळी वाद्य ः हे ताल वाद्य आहे. पूजाअर्चेच्या वेळी वाजवितात. काशा धातूची थाळी असते. मध्यभागी विशिष्ट वनस्पतीची सरकाठी किंवा सरकांडी मेणाद्वारे लावली जाते. काठीवरून अलगत बोट फिरविताच ध्वनिलहरी निर्माण होऊन सुरेल स्वर तरंग उमटतात.
घांगळी ः हे तंतुवाद्य आहे. दोन दुधी भोपळ्यांच्या पोकळ भागात छिद्रे पाडून टोकाला बांबूची नळी जोडतात. त्यावर लहान काठीचे तुकडे जोडून त्यावर तारांचा ताण दिला जातो. हे वाद्य स्त्रीलिंगी असल्याने त्याला बांगड्या, रिबन, रंगीत कापड बांधून सजविले जाते. तारांना छेडताच मृदू व कोमल सूर निघतात, हे वाद्य निसर्गदेवतेची पूजा करताना किंवा मंगल कार्यावेळी वाजवतात.
घोळकाठी ः आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य. घोळ म्हणजे समूह. लहान लोखंडी तुकड्यांचा संच (घोळ) लाकडी काठीच्या टोकाला बांधतात. ही काठी जमिनीवर ठेक्यात आपटल्यास छम छम छम आवाज निघतो. तेव्हा पायात घुंगुरू बांधल्याचा भास नर्तकाला होतो. अशी घोळ काठी बांबूपासून तयार करतात. रात्री जंगलात, शेतीत जाताना काठी आपटताच होणाऱ्या आवाजाने वन्यजीव, सरपटणारे प्राणी बाजूला जातात.
तूर वाद्य ः तूर वाद्य ढोलाच्या आकाराचे आहे. मातीचे भांडे किंवा लाकडावर कोरीव काम करून वाद्य तयार करतात. दोन्ही बाजूंना निमुळत्या आकारावर चामड्यांची पाने लावली जातात. एका बाजूला सूर, तर दुसऱ्या बाजूला ताल निघतो. त्याला काशा धातूची थाळीही जोडली जाते. तूर व थाळी या दोन्हीतून निघणाऱ्या ध्वनीत लय, ताल, सूर, ठेका यांचा सुरेख संगम असतो. आदिवासी हे वाद्य मंगल कार्यक्रमावेळी वाजवतात. मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी हेच वाद्य वाजवितात, अशी माहिती रतन चौधरी यांनी दिली.
चौकट
जवळपास २०० वर लोकवाद्य प्रदर्शनात आहेत. यात तालवाद्य, नादवाद्य, सूरवाद्य, सुशीरवाद्य, तंतूवाद्य, घोषवाद्य, रणवाद्य यांचा समावेश आहे. तराफा, मोहरीपावा, घुमळ, संबळ, पुंगी, जोगिया सारंगी, मसक, मटके, खंजीर, उमरू, सारिंद, गोपीचंद, विचिमविणा, मादळ, डेरा, पेपुडी, एक तारी अशी अनेक दुर्मिळ वाद्य येथे पाहायला मिळत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55480 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..