
इचलकरंजी महापालिका होणार
इचलकरंजी महापालिका होणार
नगरविकास खात्याने अधिसूचना जारी केल्याने मार्ग मोकळा; हरकती, सूचना मागविणार
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.५ ः इचलकरंजी महानगरपालिका होण्याचा मार्ग अखेर आज मोकळा झाला. राज्याच्या नगरविकास खात्याने याबाबतची अधिसूचना आज जारी केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात हरकती व सूचना दाखल करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. या निर्णयामुळे इचलकरंजी जिल्ह्यातील दुसरी, तर राज्यातील २८ वी महापालिका ठरणार आहे. नगरविकासचे उपसचिव सतीश मोघे यांची या अधिसूचनेवर स्वाक्षरी आहे. हरकती व सूचना या टप्प्यानंतर पुढील प्रक्रियेला वेग येणार आहे. साधारणपणे ही प्रक्रिया किमान सहा महिने चालण्याची शक्यता आहे.
महापालिका होण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांनी सतत राज्य शसनाकडे पाठपुरावा केला होता. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर महापालिका करण्याच्या प्रक्रियेला गती आली होती. दरम्यान, आज अधिसूचना जारी होताच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सध्या शहराची सुमारे साडेतीन लाख लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही हद्दवाढ न करता महापालिका करता येणे शक्य आहे. ड वर्ग म्हणून महापालिकेला मंजुरी दिली जाऊ शकते. या घडामोडीमुळे इचलकरंजी पालिकेची संभाव्य सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया रद्द होऊ शकते, असे सांगण्यात आले.
दहा वर्षांपासून इचलकरंजी महापालिका करण्याबाबत चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात काही महिन्यांपूर्वी धैर्यशील माने यांनी याबाबत आघाडी घेत राज्य शासनाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मध्यंतरीच्या काळात मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली होती. त्यावेळी त्यांनी प्रस्ताव देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या शेवटच्या सभेत एकमुखी महापालिका करण्याचा ठराव घेण्यात आला होता.
सर्व पक्षीय नेतेमंडळींनी याबाबतचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यावर सविस्तर प्रस्ताव देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने सर्वंकष अभ्यास करून प्रस्ताव तयार केला. दुसरीकडे पालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू होती. त्यामुळे महापालिका होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था होती.
२८ वी महापालिका
राज्यात सध्या २७ महापालिका आहेत. पनवेल ही २७ वी शेवटची महापालिका झाली होती. त्या धर्तीवरच इचलकरंजी महापालिकेचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून तयार केला. आता इचलकरंजी राज्यातील २८ वी महापालिका होणार आहे.
प्रस्ताव चार, मंजुरी इचलकंरजीला
राज्यात एकूण चार शहरांमध्ये महापालिकेबाबतचे प्रस्ताव आहेत. यामध्ये अंबरनाथ, यवतमाळ, जालना व इचलकरंजीचा समावेश आहे. त्यापैकी फक्त इचलकरंजीला राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यासाठी राजकीय पाठपुरावा महत्त्वाचा ठरला.
हद्दवाढ न करता
सध्या इचलकरंजी शहराची लोकसंख्या साडेतीन लाखांपेक्षा जास्त आहे. ड वर्ग महापालिका होण्यास तीन लाख लोकसंख्येची अट आहे. त्यामुळे कोणतीही हद्दवाढ न करता इचलकरंजी महापालिका करता येणे शक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे नजीकच्या ग्रामीण परिसराचे अस्तित्व कायम राहणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55482 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..