
लोकराजाला मानवंदना
फोटो- 19968
लोकराजाला मानवंदना
शंभर सेकंद स्तब्धता पाळून अनोख्या पद्धतीने कोल्हापूरकरांचा मानाचा मुजरा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आज कोल्हापूरकरांनी शंभर सेकंद स्तब्धता पाळून अनोख्या पद्धतीने मानाचा मुजरा केला. केवळ कोल्हापूर शहरच नव्हे तर अवघ्या जिल्ह्याने सकाळी दहा वाजता आहे त्या ठिकाणी थांबून ही मानवंदना दिली. निमित्त होते, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वांतर्गत राजर्षी शाहूंना अभिवादनाचे. दरम्यान, शंभर सेकंदाच्या या नीरव शांततेच्या साक्षीने साऱ्यांनी राजर्षी शाहूंचा विचार जपण्याचा, तो आणखी सर्वदूर पोचवण्याचा निर्धार केला.
नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळ परिसरात अभिवादनाचा मुख्य सोहळा सजला. अभिवादनाची वेळ सकाळी दहाची; पण, सकाळी सातपासूनच येथे शाहूप्रेमींची मांदियाळी अवतरू लागली. साडेआठनंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतून आणि शहरातील पाच अशा एकूण सतरा ठिकाणांहून निघालेल्या कृतज्ञता व समता फेरींचे येथे मशाली घेऊन आगमन होऊ लागले आणि शाहू समाधीस्थळ परिसर ‘राजर्षी शाहू महाराज की जय'' अशा जयघोषाने दुमदुमून गेला. साडेनऊच्या सुमारास प्रमुख मान्यवरांचे आगमन झाले आणि साऱ्यांच्या नजरा हातातील घड्याळांवर खिळल्या. बरोबर नऊ वाजून ५९ मिनिटांनी सारी मंडळी आहे त्या ठिकाणी उभी राहिली आणि बरोबर दहा वाजता सारा परिसर स्तब्ध झाला. शंभर सेकंदाच्या अभिवादनानंतर पुन्हा ‘राजर्षी शाहू महाराज की जय'' असा जयघोष सुरू राहिला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्य कृषी प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयश्री जाधव, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, माजी महापौर आर. के. पोवार, ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, सचिन चव्हाण, वसंतराव मुळीक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, बबनराव रानगे, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
सर्वच घटकांचा सक्रिय सहभाग
लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी सर्वच घटक सक्रिय सहभागी झाले. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नलवर एस.टी. बसेस, अन्य वाहने, जाग्यावर थांबवण्यात आली. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहूप्रेमी आणि नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली. शेतीत राबणाऱ्या बळीराजापासून ते उद्यमनगरातील मशिनवर काम करणाऱ्या कामगारापर्यंत आणि चहागाडीवाल्यापासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वच घटकांनी अभिवादन कार्यक्रमात स्वयंस्फूर्त सहभाग घेतला.
......
क्षणचित्रे....
- जिल्ह्यातील बारा तालुके आणि कोल्हापूर शहरातून पाच अशा एकूण १७ कृतज्ञता व समता फेरी सकाळी साडेआठपासून शाहू समाधीस्थळी दाखल होऊ लागल्या.
- शाहूवाडी येथून तब्बल ४५ किलोमीटरचे अंतर धावत समता फेरी शाहू समाधीस्थळी आणण्यात आली.
- शहरातून पाण्याचा खजिना, शाहू जन्मस्थळ, रेल्वे स्टेशन, शाहू मिल आणि सोनतळी येथून समता फेरी आल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
- समाधीस्थळी सहज सेवा ट्रस्ट, छत्रपती शिव शाहू फाउंडेशनतर्फे पाच हजार लोकांसाठी पर्यावरणपूरक पद्धतीने चहा-नाश्ता वाटपाची सुविधा. प्लास्टिकऐवजी पळसाच्या पानाचे द्रोण, मातीचे कुलड, केळीच्या पानाच्या चमचांचा वापर.
- शंभर सेकंद अभिवादन उपक्रमाची क्षणचित्रे शहरातील आठ चौकातून ड्रोनच्या माध्यमातून घेण्यात आली.
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संयोजन समितीने सूक्ष्म नियोजन केले.
.....
चौकट
अंबाबाई मंदिरात
शंभर वेळा घंटानाद
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी दहापूर्वी शंभर वेळा घंटानाद करण्यात आला आणि राजर्षी शाहूंना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शंभर सेकंद स्तब्धता पाळण्यात आली.
............
लंडनमध्येही राजर्षींना अभिवादन
कसबा बावडा येथील संगणक अभियंता संदीप पाटील गेली काही वर्षे लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. आपल्या लाडक्या लोकराजाला अभिवादन करण्यासाठी त्यांनी लंडन येथील स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेपाच वाजता सहकुटुंब अभिवादन केले. यावेळी त्यांची पत्नी मयुरा, नऊ वर्षांचा मुलगा विहान, मुलगी अनन्या यांनी घरातच शंभर सेकंद उभे राहून राजर्षी शाहूंना अभिवादन केले.
.....
चौकट
जागतिक रेकॉर्डसाठी प्रयत्न
शंभर सेकंद स्तब्धता पाळून अभिवादनाचा ऐतिहासिक उपक्रम देशात पहिल्यांदाच झाला असून, त्याची ग्लोबल बुक आणि एशिया पॅसिफिक बुकमध्ये नोंद करण्याच्या सूचना अनेकांनी केल्या आहेत. त्यानुसार लवकरच त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता संयोजन समितीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55498 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..