
पोलिस वृत्त
फक्त फोटो
2574
---------------
२०३५
केखलेतील वृद्धाचा तलावात मृत्यू
कोडोली ः केखले (ता. पन्हाळा) येथील एका वृद्धाचा गावतलावात बुडून मृत्यू झाला. तुकाराम ज्ञानू पाटील (वय ६५) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली. त्यांचे पुतणे बाजीराव पाटील यांनी वर्दी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तुकाराम पाटील सकाळी जनावरे धुण्यासाठी मुलांसोबत केखले येथील गावतलावात गेले होते. जनावरे धूत असताना जनावरांचा धक्का लागल्याने ते पाण्यात पडले. ते दिसेनासे झाल्याने सोबतच्या मुलांनी गोष्ट पळत जाऊन घरात सांगितली. त्यांचा पाण्यात शोध घेतला असता ते मृतावस्थेत सापडले. कोडोली येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुतार करीत आहेत.
सात बकऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यात ठार
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) येथील मेंढपाळ तानाजी गणपती वाघमोडे यांच्या सात बकऱ्या प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यशवंत सेना तालुका संपर्कप्रमुख कृष्णात हिरवे यांनी घटनेची माहिती जिल्हाध्यक्ष संजय काळे यांना दिली असता त्यांनी अंबप येथे धाव घेऊन वनविभागाचे करवीर विभागाचे रेंजर ऑफिसर रमेश कांबळे यांना माहिती देऊन पंचनामा करून घेतला. पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी बोंगार्डे यांनी शवविच्छेदन केले. कृष्णात हिरवे, राजू काळे, अंबप पोलिस पाटील पंढरीनाथ गायकवाड, सरपंच पी. एस. अंबपकर, रामकृष्ण लोकरे, आप्पा काळे, काशिनाथ हिरवे, शिवाजी हिरवे उपस्थित होते.
अपघातप्रकरणी चालक ताब्यात
आवळी बुद्रुक ः आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील अपघात प्रकरणी अनुपम आनदराव वागरे (वय ३७ करंजफेण, ता. राधानगरी) या चालकाला मोटारीसह राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले. येथील सुनीता दिनकर वाघवडे यांचा काल अपघातात मृत्यू झाला होता. चालकाने महिलेला तिथेच टाकून पलायन केल्याने नातेवाईकानी व ग्रामस्थांनी आरोपीच्या अटकेसाठी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले होते. रात्री उशिरा राधानगरी पोलिसांनी चालकाला अटक करून मोटार जप्त केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला जामीन मंजूर केला.
जरळी परिसरात गव्याचा वावर
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) परिसरात गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. जरळी गावच्या पश्चिमेकडील बाजूस मळगी नावाची शेती आहे. या ठिकाणी प्रभाकर दुंडगे जनावरे घेऊन गेले होते. त्यांना शेतात गव्याचे दर्शन झाले. या भागात दोन गवे असल्याची चर्चा आहे. त्यातील एक गवा वाट चुकून आला असण्याची शक्यता आहे. हिरण्यकेशी नदीतून गवा दुंडगेच्या हद्दीत गेल्याचे समजते. गव्याच्या दर्शनामुळे शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे.
दोन मोटारसायकलची चोरी
कोल्हापूर ः सीपीआर परिसरातून भरदिवसा चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. हा प्रकार बुधवारी घडला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली. याबाबतची तक्रार मोटारसायकल मालक रामचंद्र जाधव यांनी दिली. दरम्यान त्याच दिवशी जरगनगर परिसरातून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.
तरुणास मारहाण
कोल्हापूर ः तरुणास लाकडी बांबूने मारहाण केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. साहिल मुनीर मुल्ला (वय २२) व त्याचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार काल तेली गल्ली परिसरात घडला. यासंबधीची तक्रार जखमी शामकुमार माने यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55578 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..