
संस्थानकालीन स्थापना ते सर्वात मोठी नगरपालिका
19911
इचलकरंजी ः शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या प्रशस्त अशा इमारतीत प्रदीर्घ काळ नगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज चालले.
लोगो - इचलकरंजी
महापालिका होताना - १
वस्त्रोद्योग हा मुख्य आर्थिक कणा असलेल्या इचलकरंजी शहराचा झपाट्याने विस्तार होत गेला. तर लोकसंख्येचे प्रमाणही सद्यस्थितीला तीन लाखांच्या पुढे गेले आहे. एकूणच शहराचा वाढता विस्तार आणि विविध नागरी सुविधांची गरज ओळखून व प्रशासकीय कामकाजात गतिमानता येण्यासाठी महानगरपालिका होणे गरजेचे बनले. त्यानुसार राज्य शासनाकडून इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबतचा गुरुवारी अद्यादेश काढण्यात आला. त्यामुळे लवकरच इचलकरंजी महापालिका अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी नगरपरिषद ते महानगरपालिका करण्याबाबतच्या वाटचालीचा आढावा मालिकेतून घेत आहोत.
----------------
संस्थानकालीन स्थापना ते सर्वात मोठी नगरपालिका
इचलकरंजीला १३० वर्षांची परंपरा; उद्योग वाढीबरोबरच शहराचा विस्तारही झपाट्याने
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ६ ः इचलकरंजी शहराला संस्थानकालीन उज्ज्वल असा इतिहास आहे. संस्थान काळातच सन १८९३ मध्ये इचलकरंजी नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. तब्बल १३० वर्षांची परंपरा असणारी इचलकरंजी नगरपालिका राज्यातील सर्वात मोठी आहे. उद्योग वाढीबरोबरच शहराचा विस्तारही झपाट्याने वाढत गेला. त्यामुळे विविध नागरी सुविधा पुरविताना पालिका प्रशासनावर ताण पडत राहिला. तर प्रशासकीय कामकाज करताना अपुरे मनुष्यबळाचा प्रश्नही नेहमीच भेडसावत राहिला. त्यामुळे शहराच्या विकासाच्या कक्षा रुंदाविण्यासाठी महापालिका करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शासनाकडून अधिसूचना जारी झाल्यामुळे आता पुढील प्रक्रियेला गती येईल. तर पुढील काळात आता महानगरपालिका असलेले शहर म्हणून इचलकरंजीची नोंद होईल.
इचलकरंजी संस्थानची गादी अनेकांनी सांभाळली. मात्र, इचलकरंजी संस्थानचा अर्थात शहराचा विकास झाला तो अधिपती श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या कारकिर्दीत. त्यांच्या कारकिर्दीत इचलकरंजी नगरपालिकेची सन १८९३ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातूनच नागरिकांना पाणीपुरवठ्यासह विविध नागरी सुविधा पुरविण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी साधारणपणे इचलकरंजीची लोकसंख्या पाच-सहा हजारच्या आसपास होती. त्यावेळी गावचा मुख्य व्यवसाय शेती होता; पण कालांतराने घोरपडे सरकारांच्या प्रयत्नाने हातमाग ते यंत्रमाग असे वस्त्रोद्योगाचे पर्व सुरू झाले. १९ नोव्हेंबर १९०४ रोजी पहिल्या यंत्रमागाची धडधड सुरू झाली. त्यानंतर या उद्योगाने गेल्या शतकभराच्या कालावधीत विविध बदल स्वीकारत गरुड भरारी घेतली.
सध्या इचलकरंजी हे साध्या यंत्रमागपासून ते अत्याधुनिक मागाचे शहर म्हणून सर्वत्र परिचित झाले आहे. शहरात ८० हजार ते १ लाखाच्या आसपास साधे माग आहेत. तर सुमारे २० हजार अत्याधुनिक माग आहेत. दररोज १० लाख मीटर कापडाची निर्मिती होते. या उद्योगाला पूरक असणारे सायझिंग, प्रोसेस, गारमेंट असे अनेक आस्थापना कार्यरत आहेत. याशिवाय अनेक उद्योग बहरले; पण आजही शहराचे अर्थकारण पूर्णतः वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे या उद्योगाला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पालिकेकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. परिणामी, वस्त्रोद्योग वाढीस चालना देण्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आले. या वस्त्रोद्योगामुळेच एकेकाळी मोठ्या प्रमाणात जकात कराच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे राज्यात सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणूनही कधीकाळी इचलकरंजी नगरपालिकेचा नावलौकिक होता. (क्रमशः)
----------
चौकट
१९८४ मध्ये प्रथम हद्दवाढ
उद्योग वाढीबरोबरच शहराचा विस्तार वाढत राहिला. त्यामुळे हद्दवाढ करणे क्रमप्राप्त बनले. त्यामुळे इचलकरंजी शहराच्या हद्दीचा विस्तार सन १९८४ मध्ये सर्वप्रथम करण्यात आला. यामध्ये शहरालगतच्या ग्रामीण हद्दीतील कबनूर ग्रामपंचायतीचा काही भाग, तर शहरालगतच्या ग्रामीण हद्दीतील शहापूर संपूर्ण गाव शहरात समाविष्ट करण्यात आले. तर २०१४ मध्ये कबनूर ग्रामपंचायतीमधील इंदिरा कॉलनी परिसराचा काही भाग पालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आला. दुसऱ्यांदा ही हद्दवाढ झाली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55610 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..