
राजर्षी शाहू महाराज
20079
राजर्षी शाहूंचा विचार देशाला तारू शकेल
---
कृतज्ञता पर्व सभेचा सूर; शाहूंच्या स्मृतींची आणि कार्याची जपणूक करणे आपली जबाबदारी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः राजर्षी शाहूंचा विचार देशाला तारू शकेल, असे मत आज शाहू मिलमध्ये झालेल्या स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वाच्या कार्यक्रमात मंत्री आणि मान्यवरांनी व्यक्त केले. राजर्षी शाहूंचे विचार घरोघरी पोचविण्याचे काम या पर्वातून करण्याचेही आवाहनही केले. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आज कृतज्ञता सभेचे आयोजन केले होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. राजर्षी शाहूंचा विचार आजही महत्त्वाचा आहे. कृतीतून हे विचार दाखविण्याची गरज आहे. कोल्हापूर समृद्ध व पुरोगामी आहे. जेथे समृद्धी आहे, तेथे पुरोगामी विचार आहे, हेच कोल्हापूरचे वैशिष्ट्य आहे. जातीयवादाचे भूत गाडण्याचे काम राजर्षी शाहूंनी केले. पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे १०० सेकंदाचे अभिवादन आज राज्यभर पोचले आहे. त्या वेळी शाहूंनी शेतीसाठी काय केले, आज ते असते तर काय केले असते, व्यापारात त्यांनी काय केले असते, याचा विचार आज केला पाहिजे.’’
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘देशात आज खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे. विधवा पुनर्विवाह, सक्तीचे शिक्षण, सर्वधर्मीयांसाठी बोर्डिंग अशी कामे शाहू महाराजांनी केली. नागपुरातील अस्पृश्यता सभेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहूंना बोलविले, त्यावेळी राजर्षी शाहूंची कन्या आजारी होती. तरीही त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या शब्दाला मान देऊन तेथे हजरी लावली. त्यामुळेच आज राज्याला नव्हे, तर देशाला राजर्षी शाहूंच्या या समतेच्या विचारांची गरज आहे.’’
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘जनतेने सरकारकडे नव्हे, तर सरकारने जनतेकडे जायचे असते, हे राजर्षी शाहू महाराजांनी शिकविले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. पाल्याला शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना दंड करण्याचे कायदे केले. महिलांवरील अत्याचार, आंतरजातीय विवाहाचे कायदे त्या काळात शाहूंनी करून समतेचा आदर्श घालून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत राजर्षी शाहूंनी केलेल्या कायद्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे राजर्षी शाहूंचे प्रतिबिंब राज्यघटनेत दिसते. त्यांचे विचार जपणे हेच खरे अभिवादन असणार आहे.’’
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूरलाच नव्हे, तर देशाला समतेचा संदेश दिला. सर्वधर्म समभावाची भूमिका स्वीकारली, जी आजच्या काळात गरजेची आहे. शाहू मिलचा आराखडा २०१४ मध्ये तयार केला आहे. यात काही बदल सुचविले जात आहेत. हे बदल करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून आराखड्याला जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करू. राधानगरी धरण, जयसिंगपूर, शाहूपुरी बाजारपेठेतून सहा लाखांची निर्यात होत होती. तीच वाढवून ३२ लाखांपर्यंत नेण्याचे काम केले. १८५ मैल रस्ते केले. पुरोगामी विचारावर चालणारे हे सरकार आहे. शाहू महाराजांची स्मृती आणि त्यांच्या कार्याची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांचा सामाजिक समतेचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कर्तव्यही आम्हा सर्वांचे आहे. आज स्टार्टअपची संकल्पना आली; पण याच शाहू मिलमध्ये बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम शाहू महाराज यांनी केले. विकासचा भोंगा शाहू मिलमध्ये पहिला वाजला आहे. विकासाला गती देण्याची भूमिका शाहू महाराज यांनी घेतली.’’
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, ‘‘शाहू मिलमध्ये स्मारक करताना पूर्वी ज्याप्रमाणे शाहू मिलचे काम चालत होते, त्याची एक प्रतिकृती असावी. जेणेकरून नव्या पिढीला याची माहिती होईल. शाहू महाराज यांचे कार्य सर्व घटकांपर्यंत पोचण्यासाठी शाळांमध्ये शाहू कार्याच्या आढावा घेणारे चित्र प्रदर्शन भरवावे.’’
माजी खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बहुजनांचे नेतृत्व दिले. याबद्दलच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचा स्तंभ आहेत. हेच भाषण संसदेत सांगितल्यावर सर्वांनीच कौतुक केले. असा कोणताही विकास नाही, ज्यावर शाहू महाराज यांनी काम केले नाही. ज्या-ज्या ठिकाणी शाहू महाराज गेले, त्या-त्या ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले जातील. पिंपळगाव-पासवंत येथे सत्यशोधक समाजाला चालना दिली. नाशिक, नगर येथे विद्याप्रसारक आहे, नाशिकमध्ये अनेक ठिकाणी भेट दिली. खामगावला भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. नागपूरमध्ये बहिष्कृत समाजाला पाठबळ दिले. लंडन येथील केंब्रिजमध्ये एलएलडी मिळते, अशा सर्व ठिकाणी जाऊन त्यांचे कार्यक्रम घेतले जातील.’’
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. शताब्दी पर्व समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी आभार मानले.
१०५ वर्षांपूर्वी स्मार्टसिटीचा शोध
सध्या स्मार्टसिटीचे जग आहे; पण शाहू महाराज यांनी १०५ वर्षापूर्वी जयसिंगपूरसारखे व्यापारी शहर वसवले. स्मार्टसिटीची सुरुवात त्याकाळपासूनच सुरू आहे. या शहराच्या एका बाजूला कर्नाटक आणि दुसऱ्या बाजूला सांगली जिल्हा लागतो, त्या परिसरात आपल्या प्रजेला हक्काची बाजारपेठ मिळावी हाच त्यांचा हेतू होता. त्यामुळे स्मारकाच्या आराखड्यामध्ये जयसिंगपूरलाही स्थान मिळावे, अशी विनंती यड्रावकर यांनी केली.
सतेज पाटील कर्तबगार पालकमंत्री
शाहू कृतज्ञता पर्वाचे नेटके आणि समाजोपयोगी नियोजन केल्याबद्दल सतेज पाटील जिल्ह्याचे कर्तबगार पालकमंत्री असल्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार संभाजीराजे यांनी केले. याला उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली.
राहुल रेखावारांचे कौतुक
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून आलेल्या शाहू कृतज्ञता पर्वासाठी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही चांगले नियोजन केले. त्यामुळे राज्यात रेखावार यांना मागणी वाढणार आहे. रेखावार यांच्यासारखे जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात असावेत, असे कौतुक तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
कोविड काळात शाहू कळले
राज्यात १३ विद्यापठात राजर्षी शाहूंच्या चरित्रांवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन वर्षभर ठेवण्याचे नियोजन केले जाईल. कोविड काळात पंधरा दिवस क्वारंटाईन होतो. त्या काळात शासनाने प्रसिद्ध केलेला सुमारे दीड हजार पानांचा ‘गौरव ग्रंथ’ वाचला तेव्हा खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज कळल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
हाही एक इतिहासच
शाहू मिलचा आराखडा २०१४ मध्ये केला होता. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना व उपमुख्यमंत्री अजित पवार असताना शाहू मिलमध्ये स्मारक करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर पुढील पाच वर्षात काहीही घडलं नाही, हाही एक इतिहास आहे; पण पुन्हा एकदा या आराखड्याला गती दिली जाणार आहे. लोकांना जे अपेक्षित आहे, त्याचा समावेश केला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
दिनदर्शिकेचे प्रकाशन
प्रिन्सेस ऑफ राजर्षी शाहू महाराज या इंग्रजीतील पुस्तकाचे प्रकाशन, राजकोटमधील ज्या शाळेत राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण घेतले तेथील त्या काळातील दुर्मिळ छायाचित्राचे प्रकाशन आणि गोकुळच्या वतीने प्रकाशन केलेल्या कृतज्ञता पर्व दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख पाहण्यांच्या हस्ते झाले. दिनदर्शिकेचे वाटप साडेसहा हजार दूध संस्था आणि संघांना केले आहे.
निधी जबाबदारी केंद्र सरकारचीही
शाहू मिलमधील स्मारकासाठी निधी देण्याची जबाबदारी केवळ राज्य शासनाची नाही तर ती केंद्र सरकारचीही आहे. त्यामुळे जेवढा निधी लागणार आहे, त्याच्यासाठी माझ्यासह खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने निश्चितपणे पाठपुरावा करू, असेही माजी खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55620 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..