शताब्दी कृतज्ञता पर्व- मुख्य कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शताब्दी कृतज्ञता पर्व- मुख्य कार्यक्रम
शताब्दी कृतज्ञता पर्व- मुख्य कार्यक्रम

शताब्दी कृतज्ञता पर्व- मुख्य कार्यक्रम

sakal_logo
By

लोगो घेणे...

फोटो २००३१
कोल्हापूर ः लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वांतर्गत शुक्रवारी राजर्षी शाहू यांना १०० सेकंद स्तब्धता पाळून अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. नर्सरी बाग परिसरातील राजर्षी शाहू समाधीस्थळी मुख्य कार्यक्रम झाला.
(बी. डी. चेचर ः सकाळ छायचित्रसेवा)

‘त्या’ वृत्तींविरोधात एकत्र लढूया!
---
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; शाहू स्मारकाला लागेल तेवढा निधी ः अजित पवार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘‘ज्या वृत्तींविरोधात राजर्षी छत्रपती शाहू महाराज लढले, ती वृत्ती आजही जेथे-जेथे जिवंत असेल त्याविरोधात एकत्र लढूया आणि सामाजिक समता स्थापन करूया. त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू यांना अपेक्षित असलेले राज्य आपण घडवूया,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
राजर्षी शाहू स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वाचा मुख्य सोहळा येथील श्री शाहू मिलमध्ये झाला. त्यात श्री. ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला. याच कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू स्मारकाला निधी देण्यात महाविकास आघाडी सरकार कोठेही कमी पडणार नाही, अशीही ग्वाही दिली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते.
सोहळ्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आबिटकर, राजू आवळे, राजेश पाटील, जयंत आसगावकर, श्रीमती जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यातील ऋणानुबंधांना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘मला असे वाटते की शाहू महाराज आजही कोल्हापुरात आहेत. शाहू महाराज युगपुरुष होते. त्यांनी लोककल्याणकारी राज्यकारभार केला. त्यांची आठवण झाली नाही, असा एकही दिवस नसेल. त्यांनी समाजाला दिशा दिली. जगावे कसे आणि कोणासाठी, हे कृतीतून दाखवून दिले.’’
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘अस्पृश्‍यता कमी करणे आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचे काम राजर्षी शाहू यांनी केले. शेती, उद्योगाचाही विचार केला. आता या प्रत्येकासाठी मंत्रिमंडळात स्वतंत्र खाती आहेत. आपले शाहू महाराज हे केवळ गादीवर बसणारे नव्हते, तर सतत सामान्यजनांचा विचार करणारे होते. अस्पृश्‍यांना समानतेची वागणूक देण्यासाठी त्यांनी अनेक पातळ्यांवर संघर्ष केला. प्रत्येकाला समान अधिकार दिले पाहिजेत, अशी त्यांची धारणा होती. हे अधिकार देण्यासाठी ते जीवनभर कार्यरत राहिले. त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे,’’ अशा शब्दांत त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा गौरव केला. ते म्हणाले, की इंग्रज सरकारने त्या काळात राजर्षी शाहू महाराज यांना तुमचे दीनदुबळ्यांसाठीचे काम हे तुमच्या संस्थानात करा, अन्य ठिकाणी करू नका, असा इशारा दिला होता. त्यावर उत्तर देताना राजर्षी शाहू म्हणाले, ‘मी तुमचा आदेश स्वीकारेन; पण त्यासारखे वागणे मला अशक्य आहे.’ आपल्यावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना हे सांगण्याचे धाडस त्यांच्यात होते.
उपमुख्‍यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘राजर्षी शाहूंचे विचार १०० वर्षांनंतरही महाराष्ट्राने जपले आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्याच विचाराने महाराष्ट्र आणि देश पुढे चालत राहिला पाहिजे. शाहू महाराजांचा विचार पुढे नेण्याचे काम प्रत्येक पिढीने केले. कोल्हापूरवासीयांनी तर राजर्षी शाहूंचा विचार खऱ्या अर्थाने जागविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान विभूतींबद्दल जेव्हा आपण एखादे काम हाती घेतो, त्यावेळी निधी जाहीर करण्याची गरज नसते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू मिलमध्ये होणाऱ्या स्मारकाचा आराखडा मला आणि मुख्यमंत्र्यांना दाखविणार असल्याचे सांगितले; पण मी आताच जाहीर सांगतो, की त्यासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल. ज्यावेळी याबाबतचे पत्र आमच्याकडे आले, तेव्हा मुख्‍यमंत्री ठाकरे यांनी मला सांगितले होते, की कोणत्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी काळजी करू नये.’’
श्री. पवार म्हणाले, ‘‘मुंबईतील स्मृतिस्तंभाचे काम पूर्णत्वास नेऊ. राजर्षी शाहू महाराजांचे काम डोंगराएवढे मोठे आहे. त्यांचा प्रत्येक विचार क्रांतिकारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकल्याणकारी योजनांचे काम पुढे नेण्याचे काम खऱ्या अर्थाने राजर्षी शाहूंनी केले. त्यांनी मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. नंतरच्या काळात राज्यात आणि देशात सामाजिक क्रांती घडली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. पाल्यांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना आर्थिक दंडाची तरतूद केली. बोर्डिंगची स्थापना केली. पुरोगामी विचार रुजविले. या विचारांवरच यापुढेही चालत राहण्याचा निर्धार आपण सर्वजण मिळून करूया.’’
अध्यक्षीय भाषणात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘मानवतावाद आणि समतावाद दोन्हीकडे विशेष लक्ष देऊन यापुढे आपल्याला पावले टाकायची आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जातीयवाद निर्माण करण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे. अशा प्रयत्नांना आपण सर्वांनी हाणून पाडण्याची गरज आहे. मला खात्री आहे, की समतेचा विचार संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण भारतात पुन्हा एकदा पोचेल आणि त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचे विचार महत्त्वाचे ठरतील.’’

चौकट
देश पुरोगामी झाला पाहिजे!
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘योग्य दिशा सातत्याने धरली पाहिजे. जे पटतेय ते केले पाहिजे. पुरोगामी विचार घेऊन पुढे जाण्याची तयारी पूर्वीपासून पाहिजे. हा पुरोगामी जिल्हा कधीही प्रतिगामी शक्तींच्या हातात जाणार नाही, यासाठी आपणा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संपूर्ण भारत पुरोगामी झाला पाहिजे; पुरोगामी विचार आपण पाळले नाहीत. त्यापासून काही काळ फारकत घेतली म्हणून देशात आजची परिस्थिती दिसत आहे.’’

चौकट
‘सारथी’साठीही वसतिगृहे
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की ‘सारथी’साठी वसतिगृहाची सुरुवात करतोय. राजर्षी शाहू महाराजांनी सर्व धर्मांना एकत्रितपणे पुढे नेण्याचा विचार केला. आम्हीही ‘सारथी’च्या वसतिगृहासाठी कोल्हापुरात जागा दिली आहे. नुकतेच कोल्हापूरचे आर्किटेक्ट सुनील पाटील यांना जागा पाहण्यास सांगितले होते. पंधरा दिवसांत त्यांच्याकडून माझ्यासमोर आराखडा येईल आणि तेही काम लवकरच सुरू होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55626 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top