होन प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होन प्रदर्शन
होन प्रदर्शन

होन प्रदर्शन

sakal_logo
By

१९८०८

शिवराई सुवर्ण होनचे प्रदर्शन सुरू
राजर्षी शाहू स्मृती शताब्दी पर्व; भवानी मंडपात पर्यटकांसह आबालवृद्धांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः राजर्षी शाहू महाराज छत्रपती स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त वर्षाचे औचित्य साधून ऐतिहासिक शिवराई सुवर्ण होनचे प्रदर्शन भवानी मंडपात आज सुरू झाले. युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या २५ व्या वाढदिवस औचित्य साधून त्यांच्याच हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती उपस्थित होते. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला.
ऐतिहासिक होन राष्‍ट्रीय संग्रहालय (दिल्ली), छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय (मुंबई) असे दोन ‘होन’ आहेत पाठोपाठ कोल्हापुरात तिसरा होन आहे. देशात अनेक ठिकाणी होन असल्याचे म्हटले जाते; पण प्रत्यक्ष ते पाहायला मिळत नाही. दुर्गराज रायगडावर विठ्ठल धाकटू औकीकर कुटुंबाच्या देव्हाऱ्यात हा होन पिढ्यान पिढ्या पूजला जात होता. या नाण्याचे महत्त्व औकीकर कुटुंबाला निश्चित माहीत नव्हते. कालांतराने छत्रपती शिवरायांच्या काळातील सुर्वण होन असल्याची माहिती औकीकर कुटुंबाला समजताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे हा होन देण्‍याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिवराज्याभिषेक दिनी १० जून २०२१ ला रायगडच्या राजसदरेवर शिवराई सुर्वण होन समारंभपूर्वक रक भाजीराजे यांच्याकडे सोपवला. किल्ले रायगडावर मिळालेला हा होन ऐतिहासिकदृष्ट्या या शतकातील मोठी उपलब्धी मानली जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची स्वतंत्र टंकसाळ काढून नाणी टंकीत केली. हा होन सुरुवातीला टंकीत केलेल्या नाण्यांपैकी एक असावा, रायगडावर मिळालेल्या होनाचे अक्षर रायगड भागातील तांब्याच्या शिवराई होनशी तंतोतंत जुळत आहे. येथे प्रदर्शित होन हा अस्सल महाराष्‍ट्रीय असून तो रायगडला टंकीत झाला असण्याची शक्यता असल्याचे मानले जाते. स्मृती शताब्दीनिमित्त संभाजीराजे यांनी हा सुवर्ण होन प्रदर्शनात ठेवला आहे. अशी माहिती संयोजकांनी दिली.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, संजय पोवार, विनायक फाळके, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, प्रविण पोवार, अमर पाटील, प्रवीण उबाळे, धनंजय खाडे, राहूल शिंदे मान्यवर उपस्थित होते.

इतिहासप्रेमींची गर्दी
दिवसभरात शाहूप्रेमींनी तसेच पर्यटकांनी होन पाहण्यासाठी गर्दी केली. शिवाजी विद्यापीठाच्या समाज शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेणारे पथनाट्य सादर केले. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55635 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top