
खरेदी विक्री होणार
एक-दोन गुंठ्याची खरेदी-विक्री होणार
औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय; शासनाच्या मार्गदर्शक सूचनानंतर अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यातील कलम ८ ब नुसार एक दोन गुंठे जमीन खरेदी-विक्रीवर नोंदणी महानिरीक्षकांनी घातलेली बंदी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उठवली. न्यायालयाच्या या निर्णयाने गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेली छोट्या क्षेत्राची खरेदी विक्री पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचनानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या विक्रीस तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यातील कल ८ ब नुसार बंदी आहे; पण या तरतुदीचा अंमल कधी केला जात नव्हता. १२ जुलै २०२१ मध्ये नोंदणी महानिरीक्षकांनी या तरतुदीच्या आधारे एक, दोन गुंठ्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीला बंदी घातली होती. या बंदीमुळे अशा जमिनींचे व्यवहारच ठप्प होते. अनेक प्रकरणात खरेदीदाराने संचकारपत्र केले; पण खरेदीची प्रक्रियाच ठप्प असल्याने पुढील प्रक्रिया झाली नव्हती. अशा व्यवहारात कोट्यवधी रुपये लोकांचे अडकून पडले आहेत.
दुसरीकडे दोन-चार गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्राची खरेदी-विक्री सुरू होती. त्याचा फायदा मोठ्या बिल्डर्संना होत होता; पण छोटे क्षेत्र घेतलेल्या किंवा दिलेल्या जमीनदारांची मात्र मोठी पंचाईत झाली होती. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक यांनी १२ जुलै २०२१ रोजी काढलेल्या आदेशालाच औरंगाबाद येथील गोविंद रामलिंग सोलपुरे यांच्यासह तिघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावर सुनावणी होऊन नोंदणी अधिनियमातच अशा व्यवहारांना बंदी घालणारी कोणतीही तरतूद नसल्याचे सांगत न्यायालयाने या खरेदी-विक्रीवरील बंदी उठवताचना नोंदणी महानिरीक्षकांचा तो आदेश रद्द ठरवला.
उच्च न्यायालयाच्या या आदेशाची प्रत दोन दिवसांत शासनाला प्राप्त होईल. त्यानंतर शासनाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कमी क्षेत्राच्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होणार आहे. या निर्णयाने अशा जमीन खरेदी-विक्री केलेल्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55685 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..