
पान एक-नरडवे धरण कामास पुन्हा विरोध
20049
नरडवे : येथील प्रकल्पस्थळी धरणग्रस्तांनी शुक्रवारी केलेले ठिय्या आंदोलन.
नरडवे धरण कामास पुन्हा विरोध
प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या; मागण्यांवर ठाम, मोठा बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ : तालुक्यातील नरडवे-महंमदवाडी येथील धरणप्रकल्पाचे काम सुरू करण्यास धरणग्रस्तांनी आज पुन्हा विरोध केला आहे. पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित प्रश्न सुटत नाहीत, तोवर प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रश्नावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा सुरू ठेवली होती; मात्र सायंकाळपर्यंत तोडगा निघाला नव्हता.
नरडवे धरण प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण असून यंदा घळभरणी पूर्ण झाल्यानंतर धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जाणार आहे; मात्र अजूनही अनेक धरणग्रस्तांच्या भूखंडाचे वाटप झालेली नाही. पुनर्वसन झाले तेथे नागरी सुविधांची पूर्तता नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास विरोध केला. यापूर्वी ४ ते ७ एप्रिलदरम्यान धरणाचे काम सुरू झाले होते; मात्र धरणग्रस्तांनी काम बंद पाडले होते. त्यानंतर आज पुन्हा पोलिस बंदोबस्तामध्ये काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मोठा पोलिस फौजफाटाही प्रकल्पस्थळी तैनात होता; मात्र काम सुरू झाल्याचे समजल्यानंतर धरणग्रस्तांनी प्रकल्पस्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. प्रकल्पग्रस्तांतर्फे संतोष सावंत, गणेश ढवळ, नित्यानंद सावंत, प्रभाकर ढवळ, जयराम ढवळ, लक्ष्मण ढवळे, वैभव नार्वेकर तसेच नरडवे ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांच्याशी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांनी चर्चा केली; मात्र प्रश्न सुटत नाहीत, तोवर काम सुरू होऊ देणार नसल्याच्या मुद्द्याचा प्रकल्पग्रस्तांनी पुनरूच्चार केला.
कोट
आमच्या जमिनी घेऊन त्याचा मोबदला न देता प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहे. घळभरणीमुळे घोलणवाडीकडे जाणारा रस्ता बंद होणार आहे. जमीन मोबदला लाभधारक यादीत सुद्धा घोळ असून ज्या ६७ प्रकल्पग्रस्तांनी पैसे भरलेत त्यांची नावेच यादीतून वगळली आहेत. पुनर्वसन ठिकाणी अद्यापही नागरी सुविधा नाहीत. त्यामुळे एका बाजूने प्रकल्पाचे काम करायचे आणि दुसरीकडे आम्हाला पूर्ण विस्थापित करायचे, असे धोरण शासन आखत आहे.
- संतोष सावंत, धरणग्रस्त
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55757 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..