
ताल महोत्सव
२००८० व २००८१
लोकवाद्ये वाजतात... गातात... बोलतातही
महाताल महोत्सव; शिवमणी यांच्या वादनाची मोहिनी; कर्णतृप्तीचा मधूर आनंद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः जवळपास पन्नासभर लोकवाद्ये एकाच वेळी एकाच तालात वाजतात सुरेल स्वरात गातात. तालबद्ध ठेक्यात बोलतात आणि सुरेलपणी रसिक समुदायाच्या काळजाला साद घालतात. याची अनुभूती आंतरराष्ट्रीय दर्जाचे वादक कलावंत शिवमणी यांच्या जादुई लोकवाद्य वादनाने ताल महोत्सवाचा दुसरा दिवसही गाजला.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य संचनालयातर्फे ताल महोत्सवात दुसऱ्या दिवशी शिवमणी यांनी एकाच वेळी पन्नास लोकवाद्यांचे वादन केले. तंतुवाद्य, नादवाद्य, घोषवाद्य, रणवाद्य अशा बहुविध वाद्यांचा मेळा घेऊनच शिवमणी यांचे मंचावर आगमन झाले.
नाद वाद्याची धून वाजवत कोमल, शीतलतेचे दर्शन घडवले. पाठोपाठ तालवाद्यांचा ठेका धरायला लावला. यात ढोलकी, तबला, त्रीदलपासून ते दिमडीपर्यंतच्या जवळपास दहा वाद्यांतून त्यांनी ठेका वाजवला ही धून विशिष्ट टप्प्यावर येताच सुरू झालेली. सरगमसदृश धून वाजवताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
पुन्हा तंतुवाद्यांची धून सुरू झाली. यात एकतारी, तुणतुणे, चौंडक, तराफा यापासून विना वादनापर्यंतची दहा वाद्यांचे वादन केले. काही धून विविध सुरावटींची मिश्र धूण कर्णतृप्तीचा आनंद देऊन गेली. या सुरेल वादनातून पुढच्या टप्प्यात रणवाद्यांचा कडकडाटही केला यात हलगी, घुमक्यापासून ते ढोल ताशापर्यंतच्या रणवाद्यांची धून कडाडणारी असली तरी त्यातील कर्ण मधुरता शिवमणी यांच्या दीर्घ रियाजाची उत्तुंग प्रचिती देऊन गेली.
लोकसंगीत कलावंत मधुर पडवळ यांनी देशातील विविध प्रातांत वाजविल्या जाणाऱ्या लोकसंगीतातील धून व लोकगीते सादर केली. यात उत्तर भारतीय, दाक्षिणात्य लोकसंगीतासोबत पूर्वांचलमधील आसामी लोकगीतांचे विशेष दाद मिळवून गेली. ही संगीत मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
पुन्हा होणार महोत्सव
ताल महोत्सवाला सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री सतेज पाटील यांनीही उपस्थिती लावली. श्री. देशमुख यांनी प्रदर्शनात मांडलेल्या विविध लोकवाद्यांची पाहणी केली. असे महोत्सव डिसेंबरमध्ये पुन्हा घेण्याची घोषणा या महोत्सवात केली.
मोजका प्रतिसाद
या ताल महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत शिवमणी यांनी तसेच मधुर पडवळ यांनी केलेले सुरेल वादनाची संगीत मैफील प्रथमच स्थानिक रसिकांना प्रथमच मोफत एकायला मिळाली मात्र मिळालेला प्रतिसाद मोजकाच असल्याने संयोजकांचा हिरमोड होण्याची वेळ आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55813 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..