
बहुमजली पार्किंग
बहुमजली पार्किंगचा मार्ग मोकळा
मनाईचा अर्ज नामंजूर; महापालिकेला मोठा दिलासा
कोल्हापूर, ता. ७ ः महापालिकेच्या वतीने सरस्वती टॉकिज परिसरात सुरू असलेल्या बहुमजली पार्किंगच्या कामाला मनाई करावी म्हणून प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटीने दाखल केलेला अर्ज तिसरे कनिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एच. के. पन्हाळे यांनी नामंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयाने बहुमजली पार्किंगचा मार्ग मोकळा झाला असून महापालिकेलाही मोठा दिलासा मिळाला आहे. या कामी महापालिकेच्या वतीने ॲड. मुकुंद पवार यांनी बाजू मांडली.
बहुमजली पार्किंगची जागा ही प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटीची असून महापालिकेला ती चिल्ड्रन पार्कसाठी अटी व शर्तीवर दिली होती, तथापि संस्थेच्या संमतीशिवाय बहुमजली पार्किंगची इमारत बांधत असून या कामाला मनाई करावी, असा दावा एज्युकेशन सोसायटीने दाखल केला होता. ॲड. पवार यांनी ही जागा महापालिकेचीच होती व आहे. प्रिन्स शिवाजी एज्युकेशन सोसायटीला शाळेच्या क्रीडांगणासाठी ती दिली होती; पण संस्थेने क्रीडांगणासाठी त्याचा वापर न करता लाकूड वखारीसाठी ती भाड्याने दिल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला. ज्या कारणासाठी मिळकत महापालिकेने दिली, त्या कारणासाठी त्याचा वापर होत नसल्याने महापालिकेने १९७४ मध्येच ही जागा ताब्यात घेतली होती. त्या वेळी संस्थेकडून रितसर कब्जा घेतला आहे. त्या वेळेपासून ही जागा महापालिकेच्याच ताब्यात आहे. या जागेवर अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनासाठी बहुमजली पार्किंग इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या पार्किंगमध्ये १४६ चार चाकी व १४० दुचाकी वाहनांचे पार्किंग होणार असल्याने संस्थेने या बांधकामाला मनाई मिळावी म्हणून दाखल केलेला अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी ॲड. पवार यांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून संस्थेचा अर्ज नामंजूर केल्याची माहिती महापालिकेने पत्रकाद्वारे दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y55975 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..