
लाचलुचपत कारवाई
20213
जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यासह
अधीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात
एक लाख ७० हजार घेताना घरातच सापळा रचून पकडले
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ७ ः तीन शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणीच्या मान्यतेसाठी तब्बल एक लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक रंगेहाथ लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय ५८) आणि कार्यालयीन अधीक्षक विजयकुमार अशोक सोनावणे (वय ४१) या दोघांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनविण्यात आली आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. शुक्रवारी (ता. ६) रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, घरझडतीत दोघांकडून तेरा लाखांची रोकड जप्त करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तीन शिक्षकांच्या पदवीधर वेतन श्रेणीच्या प्रस्ताव मंजुरीचा विषय होता. तक्रारदार व त्यांचे दोन शिक्षक मित्र यांनी तो प्रस्ताव शिक्षणाधिकारी कांबळे याच्याकडे दिला होता. हे काम करून देण्यासाठी कांबळे व सोनवणे यांनी तक्रारदार व त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी ६० हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार २६ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली.
विभागाने या तक्रारीची पडताळी केली. त्यावेळी शिक्षणाधिकारी कांबळे व अधीक्षक सोनवणे यांनी प्रत्येकी ६० हजारांप्रमाणे १ लाख ८० हजार रूपये लाचेची मागणी केली. चर्चेअंती १ लाख ७० हजार रूपये मागितले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा परिषद आणि कांबळे याच्या घरासमोर सापळा लावला. त्याचवेळी सोनावणे याच्या घरी कुपवाडमधील अहिल्यानगर येथेही सापळा रचण्यात आला होता. तक्रारदारांनी सोनावणे याच्याकडे १ लाख ७० हजारांची रक्कम घरी दिली. त्यानंतर त्याने शिक्षणाधिकारी कांबळे याच्या विश्रामबाग येथील कल्पतरू संकल्प सोसायटी येथे ही रक्कम दिल्यानंतर लाचलुचपतने झडप घालत दोघांनाही रंगेहाथ पकडले. दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईत लाचलुचपतचे उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अंमलदार अविनाश सागर, प्रीतम चौगुले, धनंजय खाडे, सलिम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, संजय कलगुटगी, रवींद्र धुमाळ, राधिका माने, भास्कर भोरे यांचा सहभाग होता.
...
दोघांच्या घरातून
तेरा लाखांची रोकड
लाच घेताना रंगेहाथ सापडलेला शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे याच्या घरात दहा लाख रुपयांची; तर अधीक्षक विजयकुमार सोनावणे याच्या घरात तीन लाखांची रोकड सापडली. कांबळे हा घरातच अधीक्षकाकडून लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ सापडल्याने त्याच्या घराची तत्काळ झडती घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अगदी नियोजनबद्ध कारवाई करत दोघांही संशयितांच्या घरांवर पाळत ठेवली होती. त्यामुळे तत्काळ घरझडती होऊन मोठी रोकड जप्त करण्यात यश आल्याचे उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले.
...
यापूर्वीही अनेक तक्रारी...
शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या कारभाराविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. ॲड. धनंजय मद्वाण्णा यांनी लाचलुचपत कार्यालय (मुंबई) यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना चौकशीसाठी लाचलुचपतने पत्रव्यवहार केला. त्याशिवाय आयकर विभागातही तक्रार अर्ज दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लेखी तक्रार करण्यात आली होती. या कारवाईमुळे आणखी काही तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56006 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..