
फसवणूक
दोन तोळ्यांचे गंठण हातोहात पळविले
तिघा भामट्यांचे कृत्य; सुभाषनगर रोडवर भरदिवसाचा प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः पुढे चोरी झाली आहे, गळ्यातील दागिना काढून कागदात ठेवा, असे सांगून तीन मोटारसायकलस्वारांनी आज महिलेचे दोन तोळ्याचे गंठण हातोहात पळविले. सुभाषनगर रोडवर भरदिवसा हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी सांगितले, की मंगेशकरनगरात एक कुटुंब राहते. त्या कुटुंबातील महिला कामानिमित्त आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास गोखले महाविद्यालय चौक परिसरात गेली होती. दरम्यान, उमा चित्रपटगृह चौकाच्या दिशेने मोटारसायकल आणि मोपेडवरून आलेल्या तिघांनी त्यांना थांबविले. त्या तिघांनी ‘रात्री येथे चोरी झाली आहे. तुमच्या गळ्यातील गंठण काढून कागदात ठेवा आणि ते हातरूमालात ठेवा, असे सांगितले. त्यानंतर तिघांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे गंठण स्वतःकडे घेतले. ते कागदात बांधल्याचे भासवून फसवणूक केली.
चोरट्यांचा शोध सुरू
दागिना पुडीत ठेवल्याचे भासविणारा मोपेडस्वार सावळा असून, त्याची उंची अंदाजे साडेपाच फूट आहे. त्याने पांढऱ्या लाईनिंगचा हाफ शर्ट, काळी पॅन्ट आणि काळे हेल्मेट घातले होते. मोटारसायकलवरील त्याचा दुसरा साथीदारही सावळा असून, त्याची अंदाजे उंची साडेपाच फूट आहे. त्याने पांढरा फुल शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. तिसरा साथीदार सावळा असून, त्याची उंची अंदाजे पाच फूट सात इंच आहे. हाफ शर्ट व काळी पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. तिघे अंगाने मजबूत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56039 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..