
प्रधान सचिवांच्या सूचना
२०२४१
पालिका प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य
प्रधान सचिव विकास खारगे; इचलकरंजीत विविध प्रकल्पांची पाहणी
इचलकरंजी, ता. ७ ः इचलकरंजी पालिकेचे रूपांतर महापालिकेत होणार असल्याने पालिका प्रशासनाने शहराच्या विकासासाठी जोमाने कामास सुरुवात करावी, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास सदैव तयार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिली. त्यांनी आज शहरातील पालिकेच्या विविध ठिकाणांना भेट दिली. पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध विकासकामांचीही त्यांनी यावेळी माहिती घेतली.
इचलकरंजी नगरपालिकेस महापालिकेची मान्यता मिळाल्यानंतर प्रथमच प्रधान सचिव खारगे यांनी आज शहरास भेट दिली. त्यामुळे पालिका प्रशासनाचे ते कोणत्या सूचना करणार याकडे लक्ष होते. त्यांनी प्रथम छत्रपती राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये भेट देवून हायस्कूलच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या बाहेरील कचरा उठाव पॉईंट व गाडी पार्किंग बंद करणे, इमारतीची डागडुजी देखभाल, स्ट्रक्चरल ऑडिट करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य व गणवेश, पाठ्यपुस्तक आदीबाबत पालिका प्रशासनास सूचना केल्या. घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्प (सांगली नाका), ऑक्सिजन पार्क व नक्षत्र गार्डन (थोरात चौक), शहीद भगतसिंग गार्डन आदी ठिकाणी पाहणी केली. पालिका प्रशासनाकडून सध्या सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
शहराच्या विकासाबाबत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल; पण त्यासाठी कामांचा पाठपुरावा करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, उप मुख्यअधिकारी केतन गुजर, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, नगर अभियंता संजय बागडे, कामगार अधिकारी विजय राजापूरे, प्रशासन अधिकारी सौ. नम्रता गुरसाळे, विद्युत अभियंता संदीप जाधव आदी उपस्थित होते.
महापालिका हरकतींना
पाच जूनपर्यंत मुदत
इचलकरंजी ः इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर करण्याबाबत नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी केली आहे. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आवाहन केले आहे. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी पाच जूनअखेर मुदत दिली आहे. नागरिकांना हरकती व सूचना लेखी स्वरूपात जिल्हा सह आयुक्त कार्यालय, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे अथवा कार्यालयाच्या ई-मेलवर सादर करण्याचे आवाहन रेखावार यांनी केले आहे. मुदतीनंतर आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56051 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..