
ताल महोत्सव
२०२४७
चर्म, रणवाद्यांच्या ठेक्याची मोहिनी
ताल महोत्सव; तौफीक कुरेशींचे झेंबा वाजला; चव्हाण यांची ढोलकी गाजली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः झेंबा हे विदेशी वाद्य; पण ते भारतीय संगीताच्या ठेक्यावर वाजवताना निर्माण होणारा ताल कशी मोहिनी घालतो याची जादुई नजाकत आंतरराष्ट्रीय दर्जाचे वादक उस्ताद तौफीक कुरेशी यांनी सुरेल झेंबा वादनातून दाखविली. ढोलकी वादक विजय चव्हाण यांच्या तालबद्ध कडकडाटाने क्षणोक्षणी रोमांच उभे केले. सोबत चर्म वाद्य, रणवाद्यांची अनोखी जुगलबंदी रसिकांना चैतन्याची अनुभूती देऊन गेली तसा गेली तीन दिवस सुरू असलेल्या ताल महोत्सवात सूर-ताल-लय यांची रंगलेली मैफल कोल्हापूरकरांच्या मनःपटलावर दीर्घकाळासाठी कोरली गेली.
राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यसंचनालयातर्फे खासबाग मैदानावर सुरू भरलेल्या ताल महोत्सवात आज अखेरच्या दिवशी चर्मवाद्य, रणवाद्यांचे वादन झाले. ढोलकी वादक विजय चव्हाण यांच्यासोबत अमित शिंदे (संवादिनी), ज्ञानेश्वर सोनवणे (संबळ), जय शिंदे, नितिन शिंदे (दिमडी), श्री. आवळे, गणेश सावंत (मृदंग), भार्गव कांबळे (चौंडकं), भार्गव आवळे, सचिन आवळे (हलगी घुमकं) यांनी तालवादन सुरू केले. ढोलकीची एक सरगमची झलक चव्हाण यांनी दाखवली. सोबत संबळचा कडकडाट त्याला तितक्याच तोलामालोची हालगी घुमके व चौंडक्यांची तालबद्ध साथ मिळाली. या वाद्यांची एकाच वेळी एकाच लयीत सुरू झालेली जुगलबंदीने रसिकांना अक्षरक्षः थक्क केले.
मैफलीच्या दुसऱ्या टप्प्यात श्री. कुरेशी यांची झेंबासोबत जलतरंग हे कोमल लयीचे वाद्य तालबद्ध ठेक्याचा तबला या वाद्यांची मैफल सुरू झाली. मानवी श्वासालाही तोल- ताल-लय असते, याची प्रचिती देणारे प्रात्यक्षिक कुरेशांनी मुखाव्दारे श्वासाचा आवाज काढत सादर केला. त्यालाच धरून रंगसंगतीनुसार सफेद व निळ्या रंगांचा ताल कसा बदलतो याची झलक संवादिनीचे सूर व तबला, झेंबा वाद्यांचा ताल यांची जुगलबंदी सुरू केली. यात संवादिनीच्या सुरांसोबत हितगुज करीत झेंबा कधी अवखळ, कधी हळूवार तर कधी खट्याळ कसा वाजतो याची झलक दाखवली. रामदास पळसुले यांनी तबला तर पंडित मिलिंद तुळणकर यांनी जलतंरगाची साथ केली.
नेटके संयोजन
सांस्कृतिक कार्य संचनालयाने घेतलेल्या ताल महोत्सवात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांनी सादारीकरण केले. आज तिसऱ्या दिवशी तौफीक कुरेशी यांचे झेंबा वादन तर विजय चव्हाण यांचे ढोलकी वादन ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली. संयोजकांनी नेटके संयोजन केल्याने मैफलीची आनंद मोकळेपणाने घेता आला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56058 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..