
महागाई निदर्शने
20516
सिलिंडर पंचगंगेत फेकून महागाईचा धिक्कार
कोल्हापूर नागरी कृती समितीचे आगळे आंदोलन; लक्षवेधी घोषणाही
कोल्हापूर, ता. ९ ः जनतेला ‘अच्छे दिन’ देतो असे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी देशाला महागाईच्या खाईत लोटले आहे. जीवनावश्यक असलेल्या सिलिंडरचा दर १०१९ रुपये झाल्याने सामान्य जनतेचे कंबरडेच मोडल्याच्या व्यथा मांडत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे महिलांनी पंचगंगा नदीघाटावर चुली पेटवून स्वयंपाक केला. तसेच सिलिंडरच्या टाक्या पंचगंगा नदीत फेकून मोदींच्या हिटलरशाहीचा धिक्कार केला. यावेळी ‘मोदी तेरे देश में सस्ती दारू, महंगा गॅस’, ‘मोदीजी तुमचे अच्छे दिन बघत, आमची लाकडं नदीवर पोहोचली’ अशा लक्षवेधी घोषणा दिल्या.
महागाईचा निषेध करण्यासाठी समितीतर्फे आंदोलन केले. महिलांनी घाटावर भर उन्हात चुली पेटवून जेवण बनवले. त्यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नंतर मेलद्वारे पाठवले. निवेदनात म्हटले आहे, देश स्वातंत्र्य झाल्यापासून चांगले दिवस नसल्यामुळे देशाची सत्ता द्यावी, असे सांगत व आम्ही जनतेला ‘अच्छे दिन’ देतो असे आश्वासन देऊन मोदी यांनी सत्ता काबीज केली आहे; पण आपण दिलेले आश्वासन हवेत फेकून देशाला महागाईच्या खाईत लोटले. दोन महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात १६५ रुपयांनी वाढ झाली. आज कोल्हापुरात सिलिंडरचा दर १०१९ रुपये झाला. तुम्ही स्वकीय असून अशाप्रकारे छळवणूक करीत आहात. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोद डुणुंग, शंकरराव शेळके, भाऊ घोडके, महादेव जाधव, कादर मलबारी, चंद्रकांत बराले, राजू मालेकर, अजित सासणे, सुनीता पाटील, रेखा पाटील, रजनी कदम, अनुराधा मोरे, सुजाता पाटील, लता जगताप, स्वाती मिठारी, सारिका कोंडेकर, सुवर्णा मिठारी आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56390 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..