
इच्छुकांत जान, पण हालचाली सावध
इच्छुकांत जान, पण हालचाली सावध
प्रभाग रचनेचा कार्यक्रम; निवडणूक मुहूर्ताबाबत मात्र संभ्रम कायम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : राज्य शासनाने नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा अधिकार आपल्याकडे घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जाहीर केलेला प्रभाग रचनेचा कार्यक्रम स्थगित झाला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत निवडणूक आयोगाने पुन्हा प्रभाग रचनेचा दुसरा अंक सुरू केला आहे. यामुळे पुन्हा इच्छूकांमध्ये जान आली असली तरी त्यांच्या हालचाली मात्र सावधपणेच सुरु आहेत. निवडणुकीचा अंदाज पाहूनच या हालचालींना गती येणार आहे. निवडणुका कधी होणार, याबाबत मात्र संभ्रम कायम आहे.
सुरुवातीपासून सदस्य संख्या निश्चिती आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे पालिकांच्या निवडणुकांना मुहूर्तच मिळालेला नाही. निवडणुक आयोगाने २२ फेब्रुवारीला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत या भूमिकेवर महाविकास आघाडी ठाम राहिली. त्यामुळे शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा करुन प्रभाग रचनेचा अधिकार आपल्याकडे घेतला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मात्र निवडणूक आयोगाला कार्यक्रम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
आता आयोगाने सर्वोच्च आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. जाहीर झालेली प्रभाग रचना जेथे थांबली होती, तेथूनच कार्यक्रम सुरू करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. यामुळे प्रभाग रचना कार्यक्रमाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांमध्ये यामुळे पुन्हा एकदा जान आली आहे. नगरपालिका निवडणुकीबाबत शासकीय धोरणांच्या हेलकाव्यामुळे इच्छूक थंड पडत आहेत. निवडणुकीची एकतरी आशादायक बातमी कानावर आली तरीसुद्धा इच्छुकांमध्ये उत्साह संचारत आहे. थंड पडलेल्या हालचालींना वेग येत आहे. यावरुन निवडणुकीची उत्सुकता किती आहे, हे स्पष्ट होत आहे. कार्यकर्त्यातील उत्साह टिकवण्यासाठी निवडणुकांची भूमिका महत्त्वाची असते. परंतु निवडणुकांचा घोळ संपता संपेना झाल्याने इच्छूकांमधील उत्साहसुद्धा कमी-जास्त होत आहे. आता पुन्हा एकदा प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरु झाल्याने इच्छुकांमध्ये जान आली आहे. परंतु निवडणुकांच्या घोळामुळे तयारीत मात्र निरुत्साह आहे. निवडणुकीचा मुहूर्त दृष्टीपथात आल्यानंतरच खऱ्या अर्थाने हालचाली वेगावणार आहेत.
-----------------
चौकट
आजपासून हरकती
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर उद्यापासून (ता. १०) १४ मे पर्यंत हरकती नोंदवायच्या आहेत. २३ मे पर्यंत हरकतींवर सुनावणी होईल. ३० मे पर्यंत हरकतींवरील अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल जाईल. त्यानंतर ६ जूनला प्रभागांना अंतिम मान्यता मिळेल. मतदार यादी, आरक्षणांचा कार्यक्रम सुरु होईल. पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका जुलैमध्ये होतात की त्याला पावसाळ्यानंतरच मुहूर्त मिळणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56458 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..