
पान ३
20619
कडलगे (ता.चंदगड)ः येथे जोतिबा पाटील यांचे राहते घर आगीत जळून खाक झाले.
कडलगे खुर्दमध्ये आगीत घर भस्मसात
१० लाखांचे नुकसान ; रोख रक्कम,सोन्यासह प्रापंचिक साहित्य खाक
कोवाड, ता. ९ ः कडलगे खुर्द (ता.चंदगड) येथील जोतिबा रामू पाटील यांचे कौलारु घर आज आगीत भस्मसात झाले. आगीत रोख ६० हजार, अडीच तोळे सोने, टीव्ही संच, धान्याच्या १२ पिशव्या, कपडे यासह प्रापंचीक साहित्य जळून खाक झाले. आगीत १० लाखाचे नुकसान झाल्याचे समजते.
पाटील यांची दोन्ही मुले कामासाठी बाहेरगावी आहेत. सोमवारी सकाळी जोतिबा पाटील पत्नीसह कार्वे येथे दवाखान्याला गेले होते. सकाळी १० च्या सुमारास घराच्या मागील खोलीतून आगीचे लोट बाहेर पडले. शेजारी असलेल्या शांताबाई पाटील यांनी ते पाहून आरडाओरड सुरु केला. ग्रामस्थांनी घागरीने पाणी घालून आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. पण कौलारु घर असल्याने घराच्या छताने पेट घेतला. छतावर जाऊन पाणी मारताना नामदेव पाटील व अवधूत पाटील यांना इजा झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले. तत्पूर्वी आगीत घरातील कपाटे, कपडे, ६० हजार रुपये अडीच तोळे सोने, भांडी, कपडे, अंथरुन पांघरुन १२ पोती भात, टी.व्ही संच, कागदपत्रे, पलंग, खुर्च्या यासह सर्व प्रापंचिक साहित्य खाक झाले. आगीची माहिती मिळताच जोतिबा पाटील पत्नीसह घरी परतले. घराचे होत्याचे नव्हते झाल्याचे पाहून पाटील यांनी हंबरडा फोडला.
पंचनामा का नाही.........
सकाळी १० वाजता जोतिबा पाटील यांचे घर जळून खाक झाले. आगीत घरातील सर्वच साहित्य जळाल्याने पाटील व त्यांची पत्नी दरवाजात हताश होऊन बसले होते. या कुटूंबावर कोसळला असल्याने तलाठी यांनी तात्काळ पंचनामा करुन या कुटूंबाला धीर देण्याची गरज होती. पण तलाठी इरगोंड पाटील यांनी मंडल अधिकारी नसल्याने आज पंचनामा करता येत नाही,असे सांगून जबाबदारी झटकल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत होता.
मदतीसाठी धावले
जोतिबा पाटील यांचे आगीत घर जळून खाक झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दीपक पाटील यांनी तात्काळ पाटील कुटूंबाला १० हजार व पांडूरंग पाटील यांनी दोन हजारांची मदत केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56544 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..