प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार
प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार

प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार

sakal_logo
By

लोगो ः इचलकरंजी महापालिका होताना - ४

प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती
दुप्पट मनुष्यबळ होणार उपलब्ध; योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य
पंडित कोंडेकर ः सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ ः इचलकरंजी पालिकेकडे एकेकाळी सुमारे दोन हजार कार्यरत कर्मचारी होते. मात्र २००५ मध्ये सुधारित आकृतीबंद केल्यानंतर तब्बल ६५० पदे रद्द झाली. सध्या पालिकेकडे ११५० इतकेच कार्यरत कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज गतीने करण्यास मर्यादा पडत आहे. पण महापालिका झाल्यानंतर दुप्पट मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकते. तर अधिकार क्षेत्रात वाढ होणार असल्याने एकूणच प्रशासकीय कामकाजात गती येण्याबरोबरच शिस्त लागण्यास मदत मिळणार आहे.
इचलकरंजी अ वर्ग नगरपालिका आहे. त्यामुळे कामकाजाचा पसारा मोठा आहे. पूर्वी पालिकेकडे भरपूर मनुष्यबळ होते. पण २००५ मध्ये सुधारित आकृतीबंद जाहीर झाल्यानंतर तब्बल ६५० पदे रद्द झाली. परिणामी, या जागांवरील कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रिक्त झाली. या जागांवर नविन नियुक्ती करता येत नसल्यामुळे पालिकेकडे प्रशासकीय कामकाज करताना अडचणी येत गेल्या. सध्या ११५० कार्यरत कर्मचारी आहेत. अद्यापही ९० पदे रिक्त आहेत. यामध्ये राज्यस्तरीय संवर्गातील सुमारे २५ पदे भरलेली नाहीत. मर्यादित मनुष्यबळ असल्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना अनेक अडथळे येत आहेत. आजही शहरात अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहे. नागरिकांची कामे जलद होण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे. पण तसे चित्र नाही.
महापालिका झाल्यानंतर हे चित्र बदलू शकते. किमान दुप्पट मनुष्य बळ मिळणार आहे. आयुक्त, चार उपायुक्त दर्जाचे अधिकारी यांसह प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. सर्वात महत्त्‍वाचे म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना अधिक सक्षमपणे राबवता येणे शक्य होणार आहे. यापूर्वी राबवलेल्या योजनांचा वाईट अनुभव शहरवासीयांना आहेत. पण सक्षम दर्जाचे अधिकारी आल्यानंतर प्रशासनावरही पकड निर्माण होणार आहे. प्रशासकीय कामकाज अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. तसेच सेवांचा दर्जा सुधारणार आहे. किंबहुना नागरिकांना याचा चांगला उपयोग होणार आहे.
---------

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर कामकाजाचा डोलारा
सध्या पालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा डोलारा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. आजही सुमारे ७० चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तृतीय श्रेणीतील कामकाज पाहतात. त्यांना मूळ कामावर घेतल्यास प्रशासकीय कामकाजाचा डोलारा कोलमडू शकतो. परिणामी, महापालिका झाल्यानंतर हा प्रश्न फारसा निर्माण होणार नाही.
-------
महापालिका झाल्यानंतर....

* शहर परिवहन सेवा : औद्योगिक शहर असल्याने कामगारांची शहरात दररोज ये-जा सुरू असते. तसेच विविध कामानिमित्त शहरात नागरिकांची वर्दळ असते. अशा तरंगत्या नागरिकांसाठी शहर परिवहन सेवा देता येणे शक्य आहे. पालिकेकडे सध्या याबाबतची पदे नाहीत. पण महापालिका झाल्यानंतर ही पदे मंजूर होणे शक्य आहे.

* प्रशिक्षण अकादमी ः शहरात अपवाद वगळता सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. प्रशासकीय अधिकारी निर्माण करण्याच्यादृष्टीने महापालिका झाल्यानंतर प्रशिक्षण अकादमी सुरू करता येऊ शकते. यातून चांगले प्रशासकीय अधिकारी व खेळाडू निर्माण होतील.

* पर्यटन क्षेत्र विकास ः शहराला धार्मिक मोठी परंपरा आहे. शहापूरचे मसोबा देवालय प्रसिद्ध आहे. त्याच्या विकासासाठी ५ कोटी निधी मंजूर झाला आहे. महापालिका झाल्यानंतर हे क्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसित करता येणे शक्य आहे. महापालिका झाल्यानंतर रंकाळा धर्तीवर शहापूर खाण व नदीघाट परिसर विकसित होऊ शकतो. शिवतीर्थ दुसरा टप्पा पूर्णत्वास नेणे. तसेच अन्य काही पुरातन वास्तूंचे संवर्धन केल्यास पर्यटनाला पूरक वातावरण निर्माण होऊ शकते.

* अन्य ठळक बाबी ः
* शहराबाहेरील महत्त्‍वाचे रिंगरोड कार्यान्‍वित करणे
* पर्यावरण संतुलनासाठी दीर्घकालीन उपाययोजना
* पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी शाश्वत उपाययोजना
* झोपडपट्टी पुनर्वसन करण्याच्या योजनांना गती देणे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56553 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top