
राजर्षी शाहूंचे कार्य देशाच्या कानाकोपर्यात
20684
शाहूंचे कार्य देशाच्या कानाकोपऱ्यात
शरद पवार : प्रा. किसनराव कुराडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : तत्कालीन इंग्रज सत्तेच्या काळात राज्यकारभारला मर्यादा होत्या, तरीही राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा उपयोग हा शेवटच्या माणसाच्या भल्यासाठीच करायचा, हे सूत्र ठरवून त्यानुसारच कारभार केला, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केले. प्रा. किसनराव कुराडे यांनी लिहिलेल्या ‘स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर''या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. खासदार पवार हे खासगी दौऱ्यानिमित्त कोल्हापुरात आले आहेत. मंगळवारी सकाळी ९ वाजता ते चिक्कोडीकडे प्रयाण करणार आहेत. दरम्यान, हॉटेल पंचशील येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री. पवार यांचे स्वागत केले. यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला.
श्री. पवार म्हणाले, ‘‘राजर्षी शाहूंनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. उपेक्षित, गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी सत्तेचा प्रभावी उपयोग करण्याचे काम शाहू महाराजांनी केले. त्यामुळेच बिहार, उत्तरप्रेशच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात, गावागावांत राजर्षी शाहू महाराजांचे नाव आपणाला ऐकायला मिळते. उत्तर प्रदेशात तर त्यांच्या नावाने जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. अशा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कृतज्ञता पर्वानिमित्त त्यांच्या विचारांचा जागर सुरू आहे. त्यांच्या विचारात समाजाला पुढे नेण्याची ताकत असल्याचे खासदार पवार यांनी सांगितले.
दरम्यान, कोल्हापुरात आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या वेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योगपती व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी आमदार राजू आवळे, राजू लाटकर, आदिल फरास उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56604 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..