
प्रगतीवरील पाणी योजना तत्काळ पूर्ण करा
20677
प्रगतिपथावरील पाणी योजना पूर्ण करा
प्रशासक चव्हाण; करवीरमधील ग्रामपंचायतींच्या आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : जिल्ह्यात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनांची कामे सुरू आहेत. यातील प्रगतिपथावर असणाऱ्या पाणी योजनांची कामे तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या. करवीर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आढावा बैठकीचे आयोजन कर्मचारी सोसायटीत केले होते. यावेळी ते बोलत होते.
आढावा बैठकीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधकाम, वैयक्तिक शौचालय, पाणी गुणवत्ता कामकाज, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच जलजीवन मिशन व ग्रामपंचायत विभागाकडील विविध विषयांचाही आढवा घेतला.
दरम्यान, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्रामसेविका सुरेखा आवाड (ग्रा.पं.शेळकेवाडी) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला.
याच पद्धतीने सकाळच्या सत्रात पंचायत समिती गगनबावडा येथे सरपंच व ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या. पुढील दोन आठवड्यात उर्वरित सर्व तालुक्यांत आढावा बैठकींचे आयोजन केले आहे. बैठकीस अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरुण जाधव, प्रकल्प संचालक (ज.जि.मि.) प्रियदर्शिनी मोरे, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.)अशोक धोंगे, गट विकास अधिकारी जयवंत उगले आदी उपस्थित होते.
विधवा, अनिष्ट प्रथेत बदल करण्याचे आवाहन
राजर्षी शाहू स्मृतिशताब्दीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी घरफाळा उतारा तसेच ८ अ पत्रकावर पतीसह पत्नीचेही नाव लावण्याचे आवाहन प्रशासक चव्हाण यांनी केले. गावागावांत विधवांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. खरे तर कायद्याने सर्वांना समान व सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्यामुळे गावात विधवांबाबत असणाऱ्या चुकीच्या प्रथा बंद करण्याचे ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56625 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..