महागाईच्या मुद्यावर लोकचळवळ उभी राहील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईच्या मुद्यावर लोकचळवळ उभी राहील
महागाईच्या मुद्यावर लोकचळवळ उभी राहील

महागाईच्या मुद्यावर लोकचळवळ उभी राहील

sakal_logo
By

महागाईच्या मुद्यावर लोकचळवळ उभी राहील
---
शरद पवार; मूलभूत प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः महागाई, बेरोजगारी असे मूलभूत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. मात्र, मूलभूत प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले. आपले अपयश लपविण्यासाठी सांप्रदायिक मुद्दे पुढे केले जातात. महागाईच्या मुद्यावर भविष्यात लोकचळवळ उभी राहील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले, ‘‘पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात झाला. इंधनाच्या किमती वाढल्या की वाहतुकीचा खर्च वाढतो. घरगुती गॅसही महाग झाला आहे. महागाई आणि बेरोजगारी दूर करण्याचे आश्वासन देऊन भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. मात्र, आता त्यांना जनतेच्या या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी या प्रश्नांवरील लक्ष विचलित करण्यासाठी सांप्रदायिक मुद्दे आणले जात आहेत. महागाईच्या मुद्यावरच भविष्यात लोकचळवळ उभी राहील. कोल्हापूर चळवळीचे केंद्र आहे. येथे जनतेच्या प्रश्नांवर अनेक लोकचळवळी उभ्या राहिल्या. हनुमान चालिसावर चळवळी होत नाहीत.’’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पवार म्हणाले, ‘‘न्यायालयाने जो आदेश दिला आहे, त्याबद्दल लोकांच्यात गैरसमज आहेत. पुढील १५ दिवसांत थांबलेली निवडणूक प्रक्रिया सुरू करा, असे निकालात म्हटले आहे. प्रारूप मतदार यादी बनविणे, ती अंतिम करणे, प्रभागांवरील आरक्षणे या सर्व प्रक्रियेसाठी तीन महिने लागतीलच. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढायचे की स्वतंत्र लढायचे, याचा निर्णय तिन्ही पक्षांनी आपापसांत चर्चा करून होईल. आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. काही जणांच्या मते स्वतंत्र लढावे आणि नंतर एकत्र यावे. काहींच्या मते महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी. मात्र, याचा निर्णय एकत्र चर्चा करून केला जाईल. ओबीसी समाजातील उमेदवारांनाही संधी दिली जाईल.’’ पत्रकार परिषदेला पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्ही. बी. पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, व्यंकाप्पा भोसले उपस्थित होते.

राजद्रोहाचा कायदा बदलणे आवश्यक
राजद्रोहाच्या कायद्याबाबत श्री. पवार म्हणाले, ‘‘भीमा कोरेगाव दंगलीनंतर चौकशी आयोग नेमला गेला. ही दंगल तत्कालीन सरकारला थांबवता आली असती. फडणवीसांना आता हात झटकता येणार नाहीत. या प्रकाराबाबत मलाही समन्स बजावण्यात आले. यातील राजद्रोहाचा कायदा बदलण्यासंदर्भात त्यांनी माझ्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्र सरकार हा कायदा बदलू इच्छिते, ही सकारात्मक बाब आहे. कारण हा कायदा १८९० मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या हितासाठी केला होता. लोकशाही शासन प्रणालीत सरकारच्या विरोधात बोलण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे राजद्रोहाचे कलम उपयोगात आणता येणार नाही म्हणून त्यात बदल करणे आवश्यक आहे.’’

संभाजीराजेंबरोबर चर्चा नाही
माजी खासदार संभाजीराजे ‘राष्ट्रवादी’त प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता खासदार पवार म्हणाले, की संभाजीराजे राज्यसभेत असताना विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा व्हायची. राज्यातील काही प्रश्नांवर राज्यसभेतील महाराष्ट्रामधील सर्व खासदारांची बैठक बोलावली जायची. त्यावेळी ते यायचे व त्यांचे सहकार्य मिळायचे. मात्र, पक्षातील प्रवेशासंदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. याबाबत काही निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांशी चर्चा करूनच घेतला जाईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56729 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top