
फसवणुकीच्या गुन्ह्यात छडा
पोलिस असल्याची बतावणी करून
फसविणाऱ्या भामट्यास अटक
---
दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; संशयित पुणे जिल्ह्यातील
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाला गंडा घातलेल्या प्रकरणाचा जुना राजवाडा पोलिसांनी छडा लावला. त्यांनी संशयितास अटक केली. शब्बीर जावेद जाफरी (वय ३४, रा. लोणी काळभोर, ता. हवेली, पुणे) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की भामट्याने रंकाळा येथील शालिनी पॅलेस परिसरात १ एप्रिलला भरदिवसा पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धाचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणाचा तपास जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथक करीत होते. या गुन्ह्यातील संशयित इंदिरा सागर चौकात एका मोपेडवर हेल्मेट परिधान करून थांबल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिस त्याच्याजवळ जात असताना त्याने मोपेड जागेवरच ठेवून तो साथीदाराच्या मोपेडवरून नंगीवली चौक, शिवाजी पेठमार्गे जात असताना त्याचा अंमलदार योगेश गोसावी यांनी पाठलाग केला. चौकशीत संशयिताने त्याचे नाव शब्बीर जाफरी असल्याचे सांगितले. त्याच्याकडे कागदपत्रांसह दगड बांधलेल्या कागदाच्या पुड्या मिळून आल्या. चौकशीत त्याच्यावर गुन्हे असल्याची माहिती पुढे आली. त्याने शालिनी पॅलेस परिसरात वृद्धाला पोलिस असल्याचे सांगून लुटल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ३८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एक लाख ९६ हजार ६३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव, अंमलदार योगेश गोसावी, सागर डोंगरे, प्रीतम मिठारी, संदीप बेंद्रे, गौरव शिंदे यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56811 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..