राष्ट्रवादीचे रणशिंग, ‘जद’ चा गनिमी कावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे रणशिंग, ‘जद’ चा गनिमी कावा
राष्ट्रवादीचे रणशिंग, ‘जद’ चा गनिमी कावा

राष्ट्रवादीचे रणशिंग, ‘जद’ चा गनिमी कावा

sakal_logo
By

राष्ट्रवादीचे रणशिंग, ‘जद’ चा गनिमी कावा
गडहिंग्लज पालिका : महाविकास आघाडीच्या घोषणेने तिरंगी लढतीचे संकेत
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : आगामी नगरपरिषदेची निवडणूक महाविकास आघाडीद्वारे लढविण्याची घोषणा करुन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर व्यासपीठावरुन रणशिंग फुंकले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. दुसऱ्या बाजूला जनता दलाचे नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांची फौज मात्र गनिमी काव्याद्वारे निवडणूक नियोजनात आहे. भाजपच्याही हालचाली सुरु आहेत. महाविकास आघाडी, जनता दल आणि भाजपा अशा तिरंगी लढतीचे संकेत आतापासून मिळत आहेत. परंतु चमत्कार घडविण्याचा इतिहास असल्याने गडहिंग्लजच्या राजकारणात ऐनवेळी काहीही घडू शकते.
गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करुन जनता दलाने एकहाती सत्ता मिळविली होती. खरे तर जनता दल व राष्ट्रवादी एकमेकांचे कट्टर विरोधक. तरीही गोडसाखर कारखाना आणि पालिका हद्दवाढीची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली. परंतु, पाच वर्षात राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अलीकडील सहा महिन्याच्या गोडसाखर कारखाना राजकारणातून मुश्रीफ व शिंदे आता एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. यामुळे आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी व जनता दलाचा पैरा अशक्य आहे.
वर्षभरापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणूक तयारीत आहेत. वाढदिवस असो किंवा कोणतेही निमित्त त्यांच्या तावडीतून सुटलेले नाही. विविध योजना घराघरात पोहचवण्याची धडपड कार्यकर्त्यांची आहे. दोन दिवसापूर्वीच्या कार्यक्रमात मुश्रीफ यांनी थेट कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. महाविकास आघाडी रचनेसह नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल, असेही त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमात नकळत मुश्रीफ यांनी जनता दलाचा चिमटाही काढला. दुसऱ्या बाजूला अ‍ॅड. शिंदे, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाच्या हालचाली गनिमी काव्याद्वारे सुरु आहेत. पक्ष प्रमुखांच्या एक-दोन बैठकासह प्रभागनिहाय बैठकांतून चाचपणीही केली आहे. शिंदेंनी यापूर्वीच्या कार्यक्रमांतून विरोधक काहीही करोत, पालिकेत जनता दलाचीच सत्ता येणार असा आत्मविश्‍वास व्यक्त केला आहे. समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाही सुरुवातीपासून स्वबळाचा नारा देत आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवरील बैठकाही सुरु आहेत. यामुळे पालिकेची आगामी निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणता चमत्कार होतो, याकडेही जाणकारांचे लक्ष आहे.
--------
* बंडखोरीचे आव्हान ?
श्री. मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना व इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी पक्ष प्रमुखांशी चर्चाही करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्या आधी शहर शिवसेनेतील गटबाजी थोपविणे आव्हानाचे आहे. उमेदवारी वाटपात ही गटबाजी उफाळून येण्याचे संकेत आहेत. परिणामी महाविकासची रचना करताना बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान ज्या-त्या पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56826 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top