
खुल्या जागा बनताहेत कचऱ्याचे अड्डे
ich108.jpg
इचलकरंजी ः शहरात विविध भागात खुल्या जागेवर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------
खुल्या जागा बनताहेत कचऱ्याचे अड्डे
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न; इचलकरंजी पालिकेकडून उपायांची गरज
इचलकरंजी, ता. १० ः सध्या शहरातील विविध भागामध्ये असणाऱ्या खुल्या जागा कचऱ्याचे अड्डे बनत आहेत. नागरिकांकडून टाकलेला कचरा वेळेत काढण्यात येत नसल्याने तेथे ढीग बनत आहेत. परिणामी, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येबाबत पालिका प्रशासनाकडून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.
इचलकरंजी हे औद्यागिक शहर असल्याने क्षेत्रफळाच्या तुलनेत नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शहरात दाट वस्तीचे प्रमाण अधिक आहे. तर दररोज काम, शिक्षण, व्यवसायासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे ३० हजारहून अधिक आहे. त्यांना मुलभूत सुविधा पालिका प्रशासन पुरवीत असते. मात्र त्यांच्याकडून अजाणतेपणे होणारा कचरा पालिकेचे काम वाढवीत आहे. त्यासोबत शहरात अनेक ठिकाणी असलेल्या खासगी व पालिकेच्या मालाकीच्या खुल्या जागा या कचऱ्याचे अड्डे बनत आहेत. या खुल्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा तटबंदी नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांकडून केरकचरा, सांडपाणी टाकण्यात येते.
यातील काही जागा अडगळीत असल्याने तेथे पडलेला कचरा पालिकेकडून रोज काढला जात नाही. या जागेवर थोडा थोडा कचरा साठवून त्याचे मोठे ढीग बनत आहेत. परिणामी तेथे माशा, डास, उंदीर, झुरळ यांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. डास व माशांच्या माध्यमातून साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच कचरा टाकण्यात येणाऱ्या जागेवर कोणत्याही प्रकारचे कंटेनर किंवा कचराकुंडी नाही. त्यामुळे खुल्या जागेतील कचरा वाऱ्यासोबत परिसरामध्ये पसरत असतो. परिणामी परिसर ही अस्वच्छ होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होत असून पालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
---------
घंटागाडीद्वारे कचरा संकलन
इचलकरंजी शहरात पालिका प्रशासन घंटागाडीच्या माध्यमातून नागरिकांच्या घरोघरी जात ओला व सुका कचरा गोळा करते. त्यासोबत घरातील कचरा साठवण्यासाठी दोन बकेट दिली आहेत. मात्र काही नागरिकांकडून दिवसभरत साठणारा कचरा खुल्या जागेत टाकण्यात येतो. त्यामुळे त्यांच्यासह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी ही जबाबदारी ओळखून कचरा उघड्यावर टाकणे बंद करणे आवश्यक आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56854 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..