
७५ लाखाची रोकड ताब्यात
फोटो : २४१७८
सांगलीत मोटारीतून ७५ लाखांची रोकड जप्त
तिघांची चौकशी : सराफाची रोकड असल्याची माहिती
सांगली, ता. १० : बस स्थानक रस्त्यावरील हॉटेल सिटी पॅलेससमोर सांगली शहर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा एका मोटारीतून तब्बल ७५ लाखांची रोकड जप्त केली. मोटारीतील आकाश नारायण केंगार (वय २७, आंबानगर, आटपाडी), सुनील शहाजी कदम (वय ३५), महेंद्र लक्ष्मण जावीर (वय २६, दोघे रा. कौठुळी, ता. आटपाडी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तिघे जण एका सराफाकडे कामास असून, रकमेबाबत काही माहिती देता आली नाही, परंतु एका सराफाने रकमेबाबत मालकी सांगितली आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची पाहणी करून आयकर विभागाला माहिती कळवली जाणार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील मारुती चौक परिसरात काहीजण मोटारीतून रोकड घेऊन येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना सोमवारी रात्री मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी उपाधीक्षक अजित टिके यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार तत्काळ एक पोलिस पथक तयार करण्यात आले. त्यानुसार मारुती चौक परिसरात पोलिसांनी सापळा रचला. तेव्हा बस स्थानक रस्त्यावर विराज हॉटेलसमोर मोटार (केए ५५ एम ८०३७) येताना दिसली. पोलिसांनी मोटार थांबवली, तेव्हा आतमध्ये आकाश केंगार, सुनील कदम, महेंद्र जावीर हे तिघे जण होते. मोटारी झडती घेतल्यानंतर एका निळ्या बॅगेत ७५ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली. त्या रकमेबाबत संबंधित तिघांकडेही चौकशी केली; परंतु त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी संबंधित रक्कम जप्त करत मोटार व तिघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशी करून तिघांना सोडून देण्यात आले.
मोटारीत मिळालेल्या रकमेची मालकी सांगणारा एक सराफ पोलिसांच्या संपर्कात आला आहे. या सराफाकडील कागदोपत्री पुराव्यांची माहिती मागवली आहे. ही माहिती आयकर विभागाला कळवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.
शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक गजानन कांबळे, उपनिरीक्षक रूपाली गायकवाड, पोलिस कर्मचारी विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, झाकीरहुसेन काझी, दीपक कांबळे, अक्षय कांबळे, विक्रम खोत, अभिजित माळकर यांच्या पथकाने रोकड जप्त करण्याच्या कारवाईत सहभाग घेतला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56960 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..