
आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत - मंत्री वडेट्टीवार
राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची
तात्काळ अंमलबजावणी होणार
पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ; मान्सूनपुर्व बैठकीत दिल्या सुचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई-कोल्हापूर, ता. १० : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करा.अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल मान्सूनपुर्व बैठकीत दिल्या.
कोकण व पुणे महसूली विभागातील जिल्ह्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाली. यावेळी मंत्रालयातील कक्षातून आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार बोलत होते. बैठकीला मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक संजय धारूरकर यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.
मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय असून, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा ही राज्यात लागू करण्यात येत आहे. आपत्तीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणामध्ये योग्य तो समन्वय राहावा. यासाठी ही यंत्रणा काम करणार आहे. त्यामुळे या यंत्रणेसाठी लागणारे प्रशिक्षण व इतर माहिती जिल्ह्यांना तात्काळ पुरवावी.
यंदाच्या वर्षीही सरासरीपेक्षा जास्त व वेळेपूर्वी पाऊस येणार असल्याचा अंदाज आहे. यंदाही पाऊस लवकर सुरू होणार आहे, हे लक्षात घेता सर्व यंत्रणांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपली आपत्ती यंत्रणा बळकट करावी. मान्सूनपूर्व बैठका, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करणे, तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करावी. कोणत्याही प्रकारची आपत्ती कालावधीत जिवीत हानी होवू नये. याची खबरदारी घ्या अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y56995 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..