
चंदगड तालुका झाला रॉकेलमुक्त
चंदगड तालुका झाला रॉकेलमुक्त
ग्राहकांची तक्रार नाही; ७२ हजार लिटरची बचत, शासनाच्या तिजोरीवरील भार हलका
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ : स्वयंपाकासाठी म्हणून शिधापत्रिकेच्या माध्यमातून पुरवले जाणाऱ्या अनुदानित रॉकेलमधून चंदगड तालुका मुक्त झाला आहे. तालुक्याला दर महिन्याला सहा टॅंकर रॉकेलचा पुरवठा केला जात होता. टप्प्याटप्प्याने तो कमी करीत गेल्या महिन्यापासून पूर्णतः बंद करण्यात आला आहे. या संदर्भात ग्राहकांचीही तक्रार नसल्याने महसूल प्रशासनाच्या निर्णयाला यश आल्याचे मानले जाते.
स्वयंपाकाच्या गॅसला अनुदान दिले जात असल्याने त्याच कारणासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या रॉकेलला अनुदान नको या न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून महसूल प्रशासनाने टप्प्याटप्प्याने हा पुरवठा बंद केला. कोल्हापूर जिल्ह्यात विविध शहरात याला विरोध न होता प्रतिसाद मिळाला. परंतु ग्रामीण भागात विविध कारणांसाठी रॉकेलची गरज असल्याने त्याला विरोध होता. चंदगड तालुक्यातील १४० गावांना ८५ स्वस्त धान्य दुकानदारांतर्फे अनुदानित रॉकेलचा पुरवठा सुरू होता. चार वर्षांपूर्वी दर महिन्याला सहा टॅंकर रॉकेल पुरवठा केला जात होता. एक टॅंकरमध्ये १२ हजार लीटर रॉकेल असते. याचा विचार करता ७२ हजार लिटर रॉकेलचे वितरण होत होते. ५२ रुपये प्रती लिटर या शासकीय दराने विचार केला तरी त्यासाठी शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होत होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर ग्रामीण भागातही पुरवठा कमी करण्याबाबत प्रशासनाने पावले उचलली. दोन सिलिंडर असणाऱ्यांचा पुरवठा पूर्ण बंद, तर एक सिलिंडर असणाऱ्या ग्राहकांना मानसी एक लिटर आणि कुटुंबात तीन पेक्षा अधिक माणसे असल्यास चार लिटर पुरवठा केला जात होता. परंतु तिथेही टप्प्याटप्प्याने रॉकेल पुरवठ्याचे प्रमाण कमी करण्यात आले. २०१८ साली तालुक्याला सहा टॅंकर रॉकेल पुरवठा केले जात होते. २०२० पर्यंत ते कमी करून चार टॅंकरवर आणले. गतवर्षी त्यामध्ये पुन्हा निम्याने कपात करण्यात आली. गत महिन्यात हा तालुका रॉकेलमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले.
--------------
चौकट
६९२ ग्राहक, पण तक्रार नाही...
शेवटच्या महिन्यात रॉकेल बंद केले त्यावेळी ६९२ ग्राहकांच्या शिधापत्रिकेवर सिलिंडर असल्याबाबत शिक्का नसल्याने ते रॉकेलसाठी पात्र होते. परंतु रॉकेल बंद करूनही त्यांच्याकडून कोणतीच तक्रार नसल्याने त्यांच्या घरीही सिलिंडर असल्याचे स्पष्ट होते. नजरचुकीने त्यांच्या शिधापत्रिकेवर शिक्का पडला नसल्याने ते अनुदानित रॉकेलचा लाभ उठवत होते हे यावरून स्पष्ट होते.
---------------
कोट
शासनाच्या धोरणानुसार सिलिंडरधारकांना टप्प्याटप्प्याने रॉकेलपुरवठा कमी करीत आता पूर्ण बंद करण्यात आला आहे. यापुढे ग्राहकांना गरज असल्यास खुल्या बाजारातून रॉकेल विकत घ्यावे लागेल. या संदर्भात एकाही ग्राहकाची तक्रार आलेली नाही.
- सचिन गाडीवडर, पुरवठा अधिकारी, चंदगड
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57129 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..