
राजारामपुरी कारवाई
L21100
कोल्हापूर ः महापालिकेच्या यंत्रणेने बुधवारी राजारामपुरीतील अनेक अनधिकृत शेड पाडली.
वाढावा फोटो
L21099
कोल्हापूर ः राजारामपुरीत महापालिकेच्या कारवाईवेळी झालेली गर्दी.
राजारामपुरीत अतिक्रमणांवर
महापालिकेचा ‘जेसीबी’
विरोध काढला मोडून; अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून हटविली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः ‘आम्ही हटवितो’, ‘थोडा वेळ द्या’, ‘नोटिसा नाहीत’, अशा सर्व सबबींकडे दुर्लक्ष करत महापालिकेने आज राजारामपुरीत व्यावसायिक मिळकतींवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करत बंदिस्त पार्किंग खुले करण्यास सुरवात केली. ‘सेटबॅक’मध्ये पत्र्याचे शेड मारून सुरू केलेला व्यवसाय, रस्त्यापासून उंचीवर केलेले काँक्रिटीकरण; तसेच फरशा, तात्पुरत्या संरक्षक भिंती अशी २३ ठिकाणची अतिक्रमणे जेसीबीद्वारे काढली. या परिसरात प्रथमच झालेल्या मोठ्या कारवाईमुळे नागरिकांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, दोन ठिकाणी व्यावसायिकांकडून वाद घालण्याचा; तसेच एका ठिकाणी शिवीगाळ करण्याचा प्रयत्न झाला; पण अधिकाऱ्यांनी कारवाई सुरूच ठेवल्याने अनेक व्यावसायिकांनी नुकसान होण्यापेक्षा अतिक्रमणे काढून घेण्यास सुरवात केली होती.
राजारामपुरीमध्ये हॉटेल्स, रेडिमेड कपडे, दागिने, चप्पल आदी दुकाने आहेत. पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. राजाराम गार्डन, जुनी पोलिस चौकी ते नऊ नंबर शाळा दरम्यानच्या रस्त्यावरील काही इमारतींच्या गाळ्यांत हॉटेल व्यावसायिकांनी समोरील जागेवर शेड मारून बैठकव्यवस्था केली होती. अनेकांनी रस्त्यापर्यंतच्या जागेत विक्रीच्या वस्तू ठेवल्या होत्या. काहींच्या भिंती असल्याने दुचाकीही रस्त्यावर उभ्या कराव्या लागत होत्या; परिणामी रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतुकीला प्रचंड अडथळा होत होता.
आज विभागीय कार्यालय क्रमांक तीन व चार, नगररचना विभाग यांच्यातर्फे दुपारपासून कारवाईला सुरवात झाली. तेथील वाहतूक ठिकठिकाणी बंद केली. काही व्यावसायिक ‘नोटीस दाखवा,’ असे सांगत होते; पण ‘‘सेटबॅक’मध्ये उभारलेल्या बांधकामाला नोटीस देण्याची गरज नसते,’ असे सांगत कारवाई केली जात होती. बंदिस्त पार्किंगला नगररचना विभागाने नोटिसा दिल्या आहेत. दोन्ही बाजूंकडील इमारतींमध्ये ‘सेटबॅक’मध्ये केलेले शेड; तसेच संरक्षक भिंती काढल्या. कारवाईदरम्यान प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांच्यासह नगररचना व विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंते, जेसीबी, डंपर, कर्मचारी, पोलिस कारवाईत सहभागी झाले होते.
बैठकीनंतर २४ तासांत कारवाई
मंगळवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे नागरिकांनी पार्किंगबाबतच्या तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी पालकमंत्र्यांनीही, ‘आठ दिवसांत बंदिस्त पार्किंग खुले करा,’ असे आदेश दिले होते. त्यानुसार आज तातडीने कारवाई झाल्याने राजारामपुरी परिसरात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र राजारामपुरी मेन रोड, जनता बझार परिसरात, बस रूट या ठिकाणी रस्त्याशेजारील पार्किंग होऊ शकणाऱ्या जागेत अनेकांनी फळविक्री, विविध साहित्याचे स्टॉल, खाद्य पदार्थांच्या गाड्या लावल्या आहेत. त्यांच्यावरही अशीच कारवाई झाली तर रस्त्याशेजारील जागाही रिकामी होईल.
‘सेटबॅक’मधील बांधकामांसाठी नोटीस गरजेची नाही. बंदिस्त पार्किंगच्या इमारतींना दोन महिन्यांपूर्वी नगररचना विभागाने नोटिसा दिल्या आहेत, चार वेळा ताकीदही दिली, तरीही फरक पडला नसल्याने कारवाई केली. ही कारवाई सुरूच राहणार आहे.
- बाबूराव दबडे, उपशहर अभियंता, विभागीय कार्यालय तीन
स्थानिक नेत्यांकडून विरोध
कारवाई पाहून इतर गल्ल्यांतील व्यावसायिकांनी ‘सेटबॅक’मधील लोखंडी स्ट्रक्चर उतरवून घेण्यास सुरवात केली होती. इमारतीतील बंदिस्त पार्किंगवर अजून कारवाई केलेली नाही. एका कापड दुकानाजवळ कारवाई पोहोचल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने विरोध केला. कारवाई या रस्त्यावर करायचे ठरले नव्हते, असे काही स्थानिक नेते येऊन सांगू लागले. या दरम्यान सायंकाळ झाल्याने कारवाई थांबवण्यात आली.
अधिकाऱ्यांसोबत वाद
कारवाईदरम्यान एका हॉटेल व्यावसायिकाने अधिकाऱ्यांशी नोटिसीबाबत वाद घालताना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दाखला देत गर्भित इशारा दिल्याची चर्चा घटनास्थळी होती. त्यानंतर कारवाईला वेग आल्याचेही बोलले जाते.
यांच्यावर कारवाई
वाघडिया, महालक्ष्मी आयुर्वेद, स्मॉल युनिटी फायनान्स, कॅसल हॉटेल, हेवन कॅफे, श्रीमंत मिसळ, रोल्स एम्पायर, लजीज पिझ्झा, इंडियन टेरन, ब्लॅक बेरी, वसंत पंचमी, एलआयसी ऑफिस, लिनन क्लब, राजपुरोहित स्वीटस, राधाकृष्ण आयुर्वेद, ज्योती ब्युटीक, सारडा मेडिकल, सन्मती मेडिकल, करवीर मेन्सवेअर, पॉश क्लॉथ स्टोअर, स्पाईस मेन्स स्टुडिओ, घोटणे गॅस एजन्सी, बालाजी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57153 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..