संभाजीराजे भुमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजीराजे भुमिका
संभाजीराजे भुमिका

संभाजीराजे भुमिका

sakal_logo
By

संभाजीराजेंच्या भूमिकेची उत्सुकता
आज निर्णय; काँग्रेससोबत की ‘एकला चलो रे’ची भूमिका
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः राष्ट्रपतीनियुक्त खासदारकीची मुदत संपल्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती कोणती भूमिका घेणार याविषयी जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागली आहे. उद्या (ता. १२) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ते निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, संभाजीराजे काँग्रेसच्या विचारसरणीसोबत जाणार की मराठा समाजाच्या पाठिंब्यावर ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.
लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत संभाजीराजे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, पण त्यांचा पराभव झाला. त्याचवर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे बंधू मालोजीराजे छत्रपती यांचा कोल्हापूर उत्तरचे विद्यमान आमदार असताना पराभव झाला. त्यानंतर छत्रपती घराण्याचे हे दोन्हीही वारसदार राजकारणापासून बराच काळ अलिप्त होते. पराभवानंतर संभाजीराजे यांनी राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन, सरंक्षण करण्याबरोबरच मराठा समाजाच्या मागण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून राज्यभर त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला. रायगडावर भव्य स्वरूपात त्यांच्या पुढाकाराने होणाऱ्या शिवराज्यभिषेक सोहळ्याने देशाच्या राजकीय पटलाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. त्यातून जून २०१६ मध्ये त्यांची भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर निवड झाली.
संभाजीराजे यांची खासदारकीची मुदत २ मे रोजी संपली. पण गेल्या सहा वर्षांत त्यांनी राजकीय पक्षांपासून चार हात दूर रहाणेच पसंत केले. २०१६ नंतर झालेल्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भाजप असो किंवा अन्य कोणत्याही पक्षाचे काम केले नाही. आता खासदारकीची मुदत संपल्यानंतर मात्र त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी उत्सुकता आहे. भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाही. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबत जायचे तर मराठा आरक्षण, गड किल्ल्यांचे संवर्धन, सरंक्षण यावर ठोस भूमिका घेण्यात अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ते उद्याच्या पत्रकार बैठकीत ‘एकला चलो रे’ चा नारा देतील अशी शक्यता आहे.

मालोजीराजे काँग्रेससोबत
२००९ च्या पराभवानंतर राजकारणापासून लांब असलेले संभाजीराजे यांचे बंधू माजी आमदार मालोजीराजे हे कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीपासून पुन्हा सक्रिय झाले आहेत. या निवडणुकीत ते काँग्रेससोबतच होते, त्यामुळे भविष्यातील राजकारणात ते काँग्रेससोबत राहतील, किंबहुना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ते कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे उमेदवारही असतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57170 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top